Vidarbha supporters protest
नागपूर : वर्षानुवर्षे वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आंदोलन करणाऱ्या विदर्भवादी नेत्यांनी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा संविधान चौकात जय विदर्भ अशी हाक देण्याचे ठरविले आहे. एकीकडे 66 व्या महाराष्ट्र दिनी कस्तुरचंद पार्कवर सकाळी 8 वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.
दुसरीकडे जवळच असलेल्या संविधान चौकात विदर्भाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार विदर्भवाद्यांनी व्यक्त केला आहे. त्यापूर्वी पालकमंत्री यांना वेगळ्या विदर्भाविषयीची भूमिका स्पष्ट करा म्हणून वेळही मागितली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती व इतर विदर्भवादी संघटनांच्या वतीने वेगवेगळ्या राज्यासाठी सातत्याने आंदोलन केले गेले.
विदर्भधारणांकडून महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो. नेहमी विदर्भ राज्य घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी गर्जना केली जाते. कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात, आंदोलन होतात, पोलिसांकडून धरपकड केली जाते. मात्र अद्यापही या आंदोलनाला राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ नसल्याने यश आलेले नाही.
कधीकाळी काँग्रेस नंतर भाजप, आप असे शिवसेना वगळता सर्वांनी विदर्भ आंदोलनाचे समर्थन केले. मात्र सत्तेत आल्यानंतर सर्वांनीच वेगळ्या विदर्भ राज्याचे समर्थन करणे टाळले. भाजप राष्ट्रीय अधिवेशनात देखील या संबंधीचा ठराव करण्यात आला. मात्र पुढे त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले.तीन छोटी राज्ये जाहीर झाली पण विदर्भ वंचित राहिला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नुकतेच दोन दिवसीय अधिवेशन नागपुरात झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेत विदर्भाचे वेगळे राज्य जाहीर करावे असा ठराव संमत करण्यात आला.
राज्याचा स्थापना दिवस साजरा होताना विदर्भ राज्याचा वेगळा झेंडा संविधान चौकात फडकविण्याचा निर्णय संकल्प सभेत घेण्यात आला. आता हा निर्धार पूर्णत्वास जातो अथवा नाही हे उद्याच कळणार आहे. विदर्भात ठीकठिकाणी काळी पट्टी,काळे कपडे घालून महाराष्ट्र दिनाचा निषेध केला जाणार आहे.
उद्याच्या आंदोलनानंतर 12 मे रोजी नागपूर ते अमरावती पर्यंत जनजागरण करण्यात येणार आहे. यासाठी मेळावे आयोजित केले जातील. 14 दिवसांच्या यात्रेत ग्रामपंचायत पातळीवर सभा घेऊन वेगळ्या राज्याचे महत्त्व पटवून दिले जाईल. या यात्रेचा समारोप 25 मे रोजी अमरावती येथे होणार आहे. नेहमी पूर्व विदर्भ केंदबिंदु असतो यावेळी पश्चिम विदर्भावर भर आहे.
माजी आमदार ऍड वामनराव चटप, अरुण केदार, युवक आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर सुनील चोखारे, बाबा शेळके, अहमद कादर, गुलाबराव धांडे, अण्णाजी राजेधर आदी विदर्भवादी या जनजागरणासाठी सज्ज आहेत.