नागपूर, पुढारी वृत्तसेवा : कोणतेही संवैधानिक पद नसताना विद्यापीठाच्या प्रत्येक कामात ढवळाढवळ करणाऱ्या शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी व्हीएमव्ही कॉलेजच्या हिंदीच्या प्राध्यापिका डॉ. सोनू जेसवानी यांनी पत्रकार परिषदेत केली. डॉ. कल्पना पांडे यांनी माझे विद्यापीठातील करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त केले, असा आरोप जेसवानी यांनी यावेळी केला. (Nagpur University)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या निलंबनाला डॉ. कल्पना पांडे याच पूर्णपणे जबाबदार आहेत. डॉ. पांडे यांनी अनैतिक मार्गाने पैसे कमावण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पीएचडीचे ऑनलाईन अहवाल थांबवणे, प्राध्यापकांना ब्लॅकमेल करणे, कंत्राटी प्राध्यापकांच्या पगारातून दहा-वीस टक्के रक्कम कापून स्वत:च्या खिशात टाकणे, अनुभवाचा प्राधान्यक्रम पूर्णपणे नाकारून कनिष्ठ प्राध्यापकांना कॉलेज ऑडिट कमिटीत पाठवणे, आदी अवैध कृत्यांमध्ये त्या सहभागी असल्याचा आरोपही जेसवानी यांनी केला. (Nagpur University)
निलंबित कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी हे डोळे मिटून डॉ. पांडे यांच्या प्रत्येक अनधिकृत, अन्यायकारक आदेशाचे पालन करत होते. धवनकर प्रकरण आणि मनोज पांडे प्रकरणाच्या फाईल्स मिळाल्यास सर्व काही सत्य समोर येईल, असेही त्या म्हणाल्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या नावाचा गैरवापर करून पांडे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असे गंभीर आरोप जेसवानी यांनी यावेळी केला. (Nagpur University)