नागपूर : प्रत्येकाच्या मनामनातील देशभक्तीची भावना वृद्धींगत व्हावी याकरिता ‘भारत माता की जय म्हणत शेकडो नागपूरकर नागपूर महानगरपालिकाद्वारा आयोजित “तिरंगा मॅरेथॉन” स्पर्धेत धावले. केंद्र आणि राज्य शासनाच्या 'हर घर तिरंगा २०२५' या अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने “तिरंगा मॅरेथॉन”चे आयोजन करण्यात आले. मनपाच्या 'एक दौड देशभक्तीसाठी' या उपक्रमात मोठ्या संख्येत सहभागी होत शेकडो स्पर्धकांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी हिरवी झेंडी दाखविताच ५ किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी राठोड, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठणकर, मनपाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम, राजेश भगत, सहाय्यक आयुक्त नरेंद्र बावनकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर, डॉ. नरेंद्र बहिरवार, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, विनोद जाधव, डॉ.अनुश्री चौधरी, शरद सूर्यवंशी, पद्माकर चारमोडे, उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्यासह मनपाचे उपद्रव शोध पथकाचे जवान, विविध संस्थांचे प्रतिनिधी व शेकडो नागरिक उपस्थित होते.
सिव्हील लाईन येथील ‘रामगिरी’ पासून सुरू झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धक लेडीज क्लब चौक, जी.पी.ओ.चौक, आकाशवाणी चौक, विधान भवन चौक, महानगरपालिका प्रशासकीय इमारत, बिशप कॉटन शाळा, विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान होत मेट्रो हाऊस, तिरपुडे महाविद्यालय, जापनीज गार्डन होत अनुराधा न्यायमूर्ती बंगला येथे पोहोचले व येथेच मॅरेथॉनची सांगता झाली. सहभागी स्पर्धकांना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देण्यात आली. विशेष म्हणजे यात, मुला-मुली स्पर्धकांमध्ये प्रत्येकी प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ११ हजार, ७ हजार, ५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. प्रथम १० स्पर्धकांना 'प्युमा’ चे शूज आणि ११ ते ३० स्पर्धकांना ट्रॅकसूटचे कुपन देण्यात आले.
“तिरंगा मॅरेथॉन” मध्ये केवळ स्पर्धाच नव्हे, तर या कार्यक्रमात देशभक्ती, फिटनेस आणि मनोरंजनाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. विजेत्यांना नागपूर महानगरपालिकेतर्फे मानाचा दुप्पटा आणि आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत मुलांच्या गटात गौरव खोडतकर याने प्रथम क्रमांक पटकावला, त्याला ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि 'प्युमा शूज' देऊन गौरवण्यात आले. द्वितीय स्थानावर असलेल्या राजन यादव यांना ७ हजार रुपये आणि 'प्युमा शूज' तर तृतीय क्रमांकावर आलेल्या सौरभ तिवारी यांना ५ हजार रुपये आणि 'प्युमा शूज' प्रदान करण्यात आले. तसेच मुलींच्या गटात मिताली भोयर हिने बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवला, तिला ११ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. दुसऱ्या क्रमांकावर प्राजक्ता गोडबोले आणि तिसऱ्या क्रमांकावर अंजली मडावी हिने स्थान मिळवले. यांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार रोख व 'प्युमा शूज' प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेत ७७ वर्षांचे ज्येष्ठ धावपटू विठ्ठलराव बांते आणि ७८ वर्षांचे डोमाजी चापले यांनी धावताना तरुणांनाही लाजवेल असा उत्साह दाखवला. तसेच, प्रद्युम्न साटकर या ७ वर्षीय चिमुकल्याने आपल्या शरीरावर तिरंगा रेखाटून देशभक्तीचा संदेश दिला.
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या आकर्षक ‘सेल्फी पॉइंट’ने स्पर्धकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तिरंगा आणि नागपूर शहराच्या संकल्पनेवर आधारित या पॉइंटवर सेल्फी काढण्यासाठी स्पर्धकांनी मोठी गर्दी केली. आकर्षक सेल्फी पॉइंट मुळे छायाचित्र काढण्याचा अनुभव अधिक आनंददायी ठरला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी “तिरंगा मॅरेथॉन” मध्ये सहकुटुंब सहभाग घेतला. मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि डॉ. अनुश्री चौधरी यांनी दोन्ही मुलांसोबत पाच किलोमीटरचे अंतर पूर्ण केले.