Nagpur Bhosale dynasty sword : नागपूरच्या भोसले घराण्याची तलवार सोमवारी मुंबईत

राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सरकारच्या ताब्यात
Nagpur Bhosale dynasty sword
मुंबई : राजे रघुजी भोसले यांच्या गाजलेल्या तलवारीसह मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार.pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : नागपूरच्या भोसले घराण्याचे अध्वर्यू राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर राज्य सरकारच्या ताब्यात आली आहे. लंडनमध्ये राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ही तलवार ताब्यात घेतली.

ऐतिहासिक दस्तऐवज असलेली ही तलवार लिलावात निघाल्याचे वृत्त 28 एप्रिल 2025 रोजी समोर आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ती शासनाला मिळावी यादृष्टीने नियोजन केले. तांत्रिक कारणामुळे थेट राज्य सरकार लिलावात सहभागी होऊ शकत नसल्याने एका मध्यस्थामार्फत शासनाने लिलावात भाग घेऊन 47.15 लाख रुपयांना ही तलवार मिळवली. पाठोपाठ कायदेशीर बाबी पूर्ण करून मंत्री शेलार यांनी तलवार ताब्यात घेतली. परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. तमाम महाराष्ट्राचा हा एक ऐतहासिक विजय आहे, असे मंत्री शेलार यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाघनख्यानंतर आता मराठा साम्राज्यातील आणखी एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रात येणार आहे. 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर तलवार दाखल होईल. यानंतर मंत्री शेलार यांच्या उपस्थितीत बाईक रॅली काढून वाजत-गाजत ही तलवार दादरच्या पु. ल. देशपांडे कला अकदमीमध्ये आणली जाईल. याच दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत गड गर्जना हा कार्यक्रम होईल. राज्य सरकारने एका मध्यस्थामार्फत व्यवहार करून 47.15 लाख रुपयांना ही तलवार खरेदी केली. आता 16 ऑगस्ट म्हणजेच येत्या शनिवारपर्यंत ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे.

रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठा सैन्याचे बिनीचे शिलेदार होते. छत्रपती शाहूंनी त्यांना सेनासाहीबसुभा ही उपाधी दिली होती. 1745 च्या दशकात रघूजी भोसले यांनी बंगालच्या नवाबांविरुद्ध उघडलेल्या आघाडीचे नेतृत्व केले होते. या मोहिमा यशस्वी करत मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला आणि दक्षिण भारतात मराठेशाहीचा दबदबा त्यांनी निर्माण केला.

तलवार महाराष्ट्रात आली हा विशेष आनंदाचा क्षण ः मुख्यमंत्री

आता ही ऐतिहासिक तलवार लवकरच महाराष्ट्रात येईल आणि त्याचा कायमस्वरूपी ताबा राज्य सरकारकडे असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र

तलवारीची विशेष घडण

मराठा शैलीच्या ‘फिरंग’ पद्धतीच्या तलवारीचा हा उत्कृष्ट नमुना आहे. सरळ, एकधारी पाते आणि सोन्याचे नक्षीकाम केलेली मुल्हेरी घाटाची मूठ ही या तलवारीची वैशिष्ट्ये आहेत. तलवारीचे पाते हे युरोपीय बनावटीचे असून पात्याच्या खजान्याजवळ पाते बनवणार्‍या कंपनीचे नाव आहे. युरोपीय बनावटीची पाती ही मध्ययुगीन भारतातील उच्च वर्गांमध्ये प्रसिद्ध होती. पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग’ असा देवनागरी मजकूर सोन्याच्या पाण्याने लिहिलेला आहे.

पात्यावरील लेख ही तलवार रघुजी भोसले यांच्यासाठी बनवली गेली होती किंवा त्यांच्या वापरातील होती याकडे निर्देश करतो. तलवारीच्या मुल्हेरी मुठीवर सोन्याच्या पाण्याने कोफ्तगरी नक्षी रेखाटली आहे. 1718 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने नागपुरात भोसलेंचा खजिना लुटला. याच लुटीत ही तलवार लंडनला गेली असावी, असे जाणकारांना वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news