Temple news 
नागपूर

Temple news nagpur: कल्याणेश्वर मंदिराच्या विकास आराखड्याला मान्यता

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत बैठक संपन्न, 100 कोटी निधी देण्याची दटकेंची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : शहरातील महाल परिसरातील सुमारे ४०० वर्षे पुरातन आणि ऐतिहासिक कल्याणेश्वर मंदिराच्या भव्य विकासाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी (दि.28) सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या विकासकामामुळे नागपूरच्या ऐतिहासिक वैभवात आणि पर्यटनात मोठी भर पडणार आहे. भोसले कालीन सीनियर आणि ज्युनियर भोसले पॅलेसच्या जवळ, नागपूरच्या मध्यवर्ती भागात वसलेले कल्याणेश्वर मंदिर हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. या मंदिराच्या अगदी जवळच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय असल्यामुळे येथे वर्षभर देश-विदेशातील पर्यटक आणि भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात. प्रवीण दटके म्हणाले की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही कल्याणेश्वर मंदिर विकासाकरिता शासनाकडे मागणी केली होती.

शहरातील प्रमुख उत्सव, यात्रा आणि धार्मिक शोभायात्रा याच मंदिराच्या मार्गाने जात असल्याने येथे नेहमीच मोठी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर मंदिराचा परिसर आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच मंदिर विकास आराखड्यात एलिव्हेटेड पार्किंग केल्यास वाहन क्षमता वाढेल असे दटके यांनी बैठकीत मत व्यक्त केले. असा असेल नियोजित विकास आराखडा: प्रस्तावित विकास योजनेअंतर्गत कल्याणेश्वर मंदिर, नगारखाना आणि महाल परिसराचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.

यात प्रामुख्याने खालील कामांचा समावेश असेल;

  • भव्य पार्किंग व्यवस्था: गर्दीच्या नियंत्रणासाठी तळमजल्यावर प्रशस्त पार्किंग.बहुउद्देशीय सभागृह: धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आधुनिक सभागृह.

  • मंदिर जीर्णोद्धार व सुशोभीकरण: मंदिराचे मुख्य शिखर, गणेश मंदिर, महादेव मंदिर आणि हनुमान मंदिराचा परिसर विकसित करणे.

  • आधुनिक केंद्रे: भाविकांसाठी अद्ययावत वेधशाळा आणि योगशाळेची निर्मिती.

  • पर्यावरणपूरक उपक्रम: पाण्याचे नियोजन करण्यासाठी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्प.

  • इतर सुविधा: अत्याधुनिक विद्युतीकरण, स्वच्छ प्रसाधने आणि परिसराची आकर्षक रचना. हा विकास प्रस्ताव 78.50 कोटींचा असून शिखराचे बांधकाम आणि अद्ययावत पार्किंग चा समावेश करून रु १०० कोटी निधी देण्याची मागणी दटके यांनी केली.

या विकास आराखड्यामुळे महाल परिसराच्या विकासासोबतच नागपूर शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटन वैभवात मोठी ऐतिहासिक भर पडेल, असा विश्वास दटके यांनी व्यक्त केला . यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  मुख्य सचिव राजेश अग्रवाल, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच पर्यटन विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT