

नागपूर : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सावजी खाद्यपदार्थांबाबतच्या वक्तव्यानंतर सावजी उपाहारगृह पुन्हा चर्चेत आले असतानाच नागपुरातील तिरंगा चौक परिसरातील एका सावजी उपाहारगृहावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान स्वच्छता व आरोग्यविषयक नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने संबंधित उपाहारगृहाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. मात्र, ही कारवाई सावजी खाद्यपदार्थांवरील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर नसून नियमांच्या उल्लंघनामुळे करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तिरंगा चौकातील उपाहारगृहाची तपासणी
राम अपार्टमेंट, तिरंगा चौक, संगम चित्रपटगृहाजवळ, हनुमाननगर विभागातील संबंधित सावजी उपाहारगृहाची अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तपासणी केली. या तपासणीमध्ये अन्न सुरक्षा व मानके नियमांतील परिशिष्ट चारमध्ये नमूद केलेल्या स्वच्छता व आरोग्यविषयक आवश्यक बाबींचे पालन होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या आधारे संबंधित अन्न व्यवसायाविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात आली असून, उपाहारगृहाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.
मुंढे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झाला होता वाद
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अमरावतीतील एका कार्यक्रमात सावजी खाद्यपदार्थांबाबत केलेल्या वक्तव्यावरून अलीकडेच वाद निर्माण झाला होता. सावजी खाद्यपदार्थ खाल्ल्यास आपल्याला प्रकृतीच्या तक्रारी होऊ शकतात, तसेच अधिक तेलकट पदार्थांमुळे हृदयविकारासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो, असे त्यांनी म्हटले होते.
या वक्तव्यावर सावजी व्यावसायिक आणि समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर मुंढे यांनी स्पष्टीकरण देताना आपले वक्तव्य कोणत्याही विशिष्ट खाद्यसंस्कृतीवर किंवा सावजी समाजावर टीका करण्याच्या उद्देशाने केलेले नसल्याचे स्पष्ट केले. २००८-०९ मध्ये मित्राने सावजी मटण खायला दिले होते. त्यावेळी तिखटपणा सहन न झाल्याने आपण एक घास खाऊन ते सोडून दिले होते, असा वैयक्तिक अनुभव त्यांनी सांगितला. तसेच आपण कोणालाही सावजी खाऊ नका, असे म्हटलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘कारवाई नियमभंगामुळेच’
मुंढे यांच्या वक्तव्यानंतर लगेचच सावजी उपाहारगृहावर कारवाई झाल्याने या कारवाईची चर्चा होत आहे. मात्र, संबंधित उपाहारगृहाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई स्वच्छता व आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन आढळल्यामुळेच करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही नियमित निलंबनाची कारवाई असून तत्काळ निलंबनाची कारवाई नसल्याचेही प्रशासनाने नमूद केले.
नियमभंग आढळल्यास पुढेही कारवाई
नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून अन्न व्यवसायांची नियमित तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांविरोधात नियमानुसार कठोर कारवाई केली जाते. त्यामुळे सावजी खाद्यपदार्थांबाबतचा वाद एकीकडे सुरू असतानाच, प्रशासनाने मात्र तिरंगा चौकातील कारवाईचा संबंध थेट स्वच्छता व आरोग्यविषयक नियमांशी असल्याचे स्पष्ट केले आहे.