नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील भोसलेकालीन प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिराला राज्य सरकारच्या वतीने पर्यटन स्थळाचा 'अ' दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. ११ वर्षांनंतर या मागणीला यश मिळाले असून यामुळे मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर अनेक सेलिब्रिटींचे ते आराध्य दैवत आहे. नागपुरच्या दीक्षाभूमी, ताजबाग व टेकडी गणेश मंदिराला 'अ' दर्जा मिळावा, यासाठी सातत्याने मागणी होत होती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांनी २०१३ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी रेटली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. फडणवीस यांनी संबंधितांना निर्देश दिल्यानंतरही त्याकडे शासन प्रशासन पातळीवर दुर्लक्ष करण्यात आले. अखेरीस हा प्रस्ताव मार्गी लागला असून पाच कोटी रुपये देखील सरकार मार्फत देण्यात आले आहेत.
५१ कोटी रुपयांची मागणी केलेली असल्यामुळे उर्वरित ४६ कोटी शासनाने तातडीने द्यावे तसेच मंदिर विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेली सैन्याची जमीनही मिळावी, जेणेकरून नागपूरकरांचे आराध्य देवस्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिराचा सर्वांगीण विकास होऊ शकेल. भाविकांच्या सुविधांमध्ये भर पडेल, अशी मागणी या निमित्ताने भूषण दडवे यांनी 'पुढारी'शी बोलताना केली आहे. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी तसेच मंदिराचे विश्वस्त, पदाधिकाऱ्यांनी सातत्याने आपल्याला या बाबतीत सहकार्य केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :