नागपूर : मिहानमध्‍ये येणार एअरोस्‍पोर्ट एअरक्राफ्ट निर्मिती युनिट  | पुढारी

नागपूर : मिहानमध्‍ये येणार एअरोस्‍पोर्ट एअरक्राफ्ट निर्मिती युनिट 

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील म‍िहानमध्‍ये लवकरच एअरस्‍पोर्ट एअरक्राफ्ट निर्मिती युनिट स्‍थापन केले जाणार असून नागपूर व चंद्रपूरमध्‍ये पायलटसाठी सिम्‍युलेटर ट्रेनिंग सेंटर उभारण्‍यात येणार आहे. चंद्रपूरमध्‍ये नुकत्‍याच पार पडलेल्‍या ऍडव्‍हांटेज चंद्रपूर – इंडस्ट्रियल एक्स्पो आणि बिझनेस कॉन्क्लेव्हमध्‍ये यासंदर्भात सामंजस्‍य करार करण्‍यात आले.
अनंत एव्हिएशन, नागपूर आणि एसआयएडी यूएसए व सिटीफ्लाय यूएसए या दोन प्रमुख कंपन्यांनी चंद्रपूर जिल्हा प्रशासनासोबत या दोन सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी संस्थापक अध्यक्ष व सीईओ विशाल बांगरे, उज्‍ज्‍वल बांबल, कॅप्‍टन प्रसन्‍न निखाडे, पायलट सीएफओ रोहणकर, प्रा. पी. चौधरी, योगेंद्र कुमार, आकाश चिट्टम‍िटवार, राजेश नायडू यांची उपस्‍थ‍िती होती.
या करारांतर्गत, दोन व आणि चार आसनी विमानांमध्ये वैमानिक प्रशिक्षण, सिम्युलेटर प्रशिक्षण सुविधा, पर्यटन सेवा, यासह हॉट एअर बलूनिंग, पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंग, हँड ग्लायडर अश्या साहसी क्रीडा प्रकारांचा समावेश राहील, अशी माहिती अनंत एव्हिएशनचे संस्थापक अध्यक्ष व सीईओ विशाल बांगरे यांनी दिली. याशिवाय, कृषी उद्देशांसाठी ड्रोन प्रशिक्षण, चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात औद्योगिक उपक्रमांची स्थापना आणि संचालन सुलभ करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि दोन्ही कंपन्यांमध्ये सहकार्यासाठी एक फ्रेमवर्क तयार करणे, याचाही समावेश राहणार आहे.

Back to top button