Olympiad Exam Winners Adwik Bobade Silver Medal
नागपूर: जगातील सर्वात मोठे ऑलिंपियाड असलेल्या सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशनने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड परीक्षेत नागपूरमधील एका विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय क्रमांक मिळवला आहे. दिल्ली पब्लिक स्कूलच्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याने अद्विक सुमित बोबडेने राष्ट्रीय विज्ञान ऑलिंपियाडमध्ये दुसरे स्थान मिळवून आंतरराष्ट्रीय रौप्य पदक आणि प्रमाणपत्र जिंकले.
या वर्षीच्या एसओएफ ऑलिंपियाडमध्ये ७२ देशांतील सुमारे लाखो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. ज्यात नागपूरमधील १लाख २५ हजार २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. सहभागींमध्ये नागपूरमधील स्वामीनारायण शाळा, आदर्श संस्कार विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज, भवन भगवानदास पुरोहित विद्या मंदिर, स्कूल ऑफ स्कॉलर्स यासारख्या नामांकित शाळांचा समावेश होता.
सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन (एसओएफ) ने दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे २०२४-२५ च्या ऑलिंपियाड परीक्षेतील टॉपर विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात विविध शाळांमधील ७५० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर २२२ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय रँक-१ मिळवणाऱ्या ७४ विद्यार्थ्यांना ५०,००० रुपये आणि सुवर्णपदके, आंतरराष्ट्रीय रँक-२ मिळवणाऱ्यांना २५,००० रुपये आणि रौप्य पदके, तर आंतरराष्ट्रीय रँक-३ मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपये आणि कांस्य पदके देण्यात आली. यासोबतच सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशनने शिक्षकांचा सन्मानही केला.