नागपूर: नागपूर-अमरावती रोडवरील कोंढाळीनजीक असलेल्या बाजारगावच्या स्फोटके तयार करणाऱ्या आणि सोलार कंपनीत बुधवारी मध्यरात्री मोठा स्फोट झाला. एका कामगाराचा मृत्यू झाला असून एकंदर १७ जण जखमी झाले आहेत.
या स्फोटात जखमींमध्ये सर्वश्री कैलास वर्मा, मनीष वर्मा, सनी कुमार, अरुण कुमार, अतुल मडावी, सौरभ डोंगरे, तेजस बांधते, सुरज गुटके, अखिल बावणे, धर्मपाल मनोहर, अशी असून स्फोटाआधी फायर झाल्याने कामगारांना प्लांटच्या बाहेर पडण्यास वेळ मिळाला. त्यामुळेच मोठा अनर्थ टळला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
देशाच्या संरक्षण विभागासाठी अनेक महत्वाची उत्पादने येथे तयार केली जातात हे विशेष. या भीषण स्फोटात उडालेल्या मलब्याने दोन कामगार गंभीर जखमी झाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेकांनी काल रात्री आणि आज सकाळी घटनास्थळी गर्दी केली आहे. जखमींना अमरावती रोडवरील दंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रात्री घटनेची माहिती मिळताच अनिल देशमुख यांच्या वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या व कंपनीच्या दोन गाडीने ६ जखमींना नागपूरकडे रवाना केले गेले.
सिव्ही युनिटमध्ये हा स्फोट झाला असून जखमी सर्व घटना स्थळाच्या बाजुलाच २०० मीटरवर असलेल्या लॅबमध्ये काम करत होते. प्रत्यक्षात घटनास्थळी किती कामगार होते त्याची माहिती व्यवस्थापनाकडून मिळाली नाही. सुरक्षेच्या कारणावरुन कंपनीच्या आत कोणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली. जखमींपैकी अनेकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर एका कामगारांचा मृतदेह मिळाला. २ कामगारांच्या हाताला दुखापत असुन त्यांना राठी हॅास्पीटल धंतोली येथे दाखल करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्यासह प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत.