Theft News File Photo
नागपूर

Nagpur Temple Theft | दर्शनाच्या बहाण्याने मंदिरात चोरी; दुर्गामातेचा चांदीचा मुकुट व पितळी घंटा लंपास

सीसीटीव्हीत कैद झाली संपूर्ण घटना; शांतीनगर पोलिसांनी काही तासांत ६५ वर्षीय आरोपीला केली अटक

पुढारी वृत्तसेवा

Brass Bell Stolen Nagpur

नागपूर : नागपूरच्या शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लालगंज येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी आलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीने दुर्गामातेचा चांदीचा मुकुट आणि मंदिरातील पितळी घंटा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली.

लालगंज येथील हनुमान मंदिरात रविवारी दुपारी घडलेल्या या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, श्रवण खाकरे (वय ६५) हा मंदिरात भाविकाच्या वेशात आला. त्याने प्रथम देवाचे दर्शन घेतले, पूजा-अर्चा केली आणि मंदिराची प्रदक्षिणाही घातली.

यानंतर मंदिरातील गर्दी कमी होण्याची वाट पाहत आरोपीने संधी साधली. दुर्गामातेच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि मंदिरातील पितळी घंटा चोरून तो घटनास्थळावरून पसार झाला.

मात्र, मंदिरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आरोपीची संपूर्ण हालचाल आणि चोरीची घटना स्पष्टपणे कैद झाली. मंदिर व्यवस्थापनाने शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी श्रवण खाकरे याला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असून तो सध्या हुडकेश्वर परिसरात वास्तव्यास होता.

सध्या पोलिस आरोपीची कसून चौकशी करत असून, यापूर्वीही त्याने मंदिरे किंवा इतर ठिकाणी अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडवल्या आहेत का, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, शहरात मंदिरांमधील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT