Nagpur School Tragedy
नागपूर : नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजकुमार केवलरामानी शाळेत बुधवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मध्यंतराच्या वेळी तिसरीत शिकणारा आठ वर्षीय विद्यार्थी अचानक शाळेच्या व्हरांड्यात कोसळला. शाळा प्रशासनाने तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे शाळा परिसरासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजकुमार केवलरामानी शाळेत बुधवारी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे. मृत विद्यार्थ्याची ओळख हनित शालीग्राम कटरे (वय ८, रा. समतानगर) अशी झाली आहे. तो शाळेच्या तिसरी इयत्तेत शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हनितची आई त्याला नेहमीप्रमाणे शाळेत सोडून गेली होती. शाळेचे नियमित वर्ग सुरू असताना मध्यंतराच्या वेळी हनित वर्गाबाहेर आला. याचदरम्यान तो अचानक शाळेच्या व्हरांड्यात कोसळला. हा प्रकार लक्षात येताच शिक्षक व शाळेतील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूमागील नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या धक्कादायक घटनेनंतर शाळा परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. सहाध्यायी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्येही हळहळ व्यक्त करण्यात आली. संतप्त नागरिकांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशा वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था आणि आवश्यक खबरदारी घेतली जात होती का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे तसेच चौकशीत कोणाचाही निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.