नागपूर गुन्हे शाखेने तीन संशयितांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी सक्करदरा पोलिसांच्या स्वाधीन केले Pudhari
नागपूर

Nagpur Crime | कामावरून काढल्याच्या रागातून २ फळ विक्रेत्यांचा निर्घृण खून; तीन आरोपींना अटक

नागपूर गुन्हे शाखेने तीन संशयितांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी सक्करदरा पोलिसांच्या स्वाधीन केले

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Fruit Seller Death

नागपूर : फळ विक्री व्यवसायातील जुन्या वादातून आणि कामावरून काढून टाकल्याच्या रागातून दोन फळ विक्रेत्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१०) मध्यरात्रीच्या सुमारास सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी नागपूर गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना पुढील चौकशीसाठी सक्करदरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

मृतांची ओळख आदित्य उर्फ सोनू बोडवे आणि दादू उर्फ आदित्य राहुलकर अशी झाली आहे. दोघेही रघुजीनगर परिसरातील गोंड वस्ती, छोटा ताजबागजवळ फळ विक्रीचा व्यवसाय करत होते.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृतक आणि आरोपी यांच्यात फळांच्या दुकानातील कामावरून काढून टाकण्याच्या कारणावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादाचे पर्यवसान अखेर दुहेरी हत्येत झाले. आरोपींनी दोघांवर विटा, दगड तसेच धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पोलिसांनी वैभव उर्फ दादू प्रदीप डोंगरे (वय ३०, रा. नरसाळा, दिघोरी), वेदांत उर्फ डब्बा अजय डबीर (वय २०, रा. रघुजीनगर) आणि अभिषेक उर्फ तात्या उत्तम राऊत (वय २६, रा. न्यू नंदनवन) यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

घटनेनंतर आरोपी फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवत विहीरगाव परिसरातील गारगोटी नाल्याजवळून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्यांना सक्करदरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या दुहेरी हत्याकांडामुळे सक्करदरा आणि रघुजीनगर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्येमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT