Nagpur crime news : नागपूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात मोठी कारवाई करत आरोपींची परेड घेतली.  Pudhari
नागपूर

Nagpur crime news : नागपूर ग्रामीण पोलिसांचा ‘रेकॉर्डवरील गुन्हेगारां’वर वॉच; ७५१ आरोपींची घेतली परेड

२३ पोलीस ठाण्यांमध्ये एकाच वेळी कारवाई; गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम

पुढारी वृत्तसेवा

Nagpur crime news

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात मोठी कारवाई करत ७५१ आरोपींची परेड घेतली. गंभीर गुन्हे, मालमत्तेविषयक गुन्हे, महिला व बालकांवरील अत्याचार, अवैध दारूविक्री, जुगार तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींची पोलीस ठाण्यांमध्ये हजेरी घेऊन त्यांची सविस्तर पडताळणी करण्यात आली. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पोलिसांचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांमध्ये एकाच वेळी आरोपी परेड

ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांमध्ये एकाच वेळी आरोपी परेड घेण्यात आली. या वेळी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची उपस्थिती, सध्याच्या हालचाली, वास्तव्याची माहिती आणि भविष्यातील संभाव्य गुन्हेगारी हालचालींबाबत तपासणी करण्यात आली.

७५१ रेकॉर्डवरील आरोपींची पडताळणी

नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील विविध उपविभागांमध्ये पुढीलप्रमाणे आरोपी परेड घेण्यात आली. कंसात आरोपींची संख्‍या नागपूर उपविभाग – (९५), उमरेड उपविभाग (१४०), सावनेर उपविभाग ( १४०), कन्हान उपविभाग (७०), रामटेक उपविभाग ( १२५), काटोल उपविभाग ( १८१) अशी एकूण ७५१ रेकॉर्डवरील आरोपींची पडताळणी करण्यात आली.

गुन्हेगारांवर सातत्याने राहणार पोलिसांचा वॉच

या मोहिमेदरम्यान पोलिसांनी प्रत्येक आरोपीची वैयक्तिक माहिती तपासून त्यांच्या सध्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले. भविष्यात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असून, जिल्ह्यात कायद्याचा धाक कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय असल्याचे सांगण्यात आले. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांना चाप बसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT