नागपूर, पुढारी वृत्तसेवा : युवक काँग्रेसच्या बैठकीनंतर संघ मुख्यालयाला घेराव आंदोलनावरून युवक काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची स्थिती आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच राम मंदिर स्थापनेनंतर देशात स्वातंत्र्य अनुभवास आले, असे वक्तव्य केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांचा अपमान करणारे हे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आदेशावरून नागपुरात संघ मुख्यालय परिसरात निदर्शने करण्याच्या युवक काँग्रेसच्या या महत्वाच्या आंदोलनामध्ये दांडी मारल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने पदमुक्त करण्यात आले आहे. (Nagpur Congress Protest)
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील ज्या 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने जबाबदारी पासून कार्यमुक्त करण्यात आले. या पदाधिकाऱ्यांमध्ये विजय वडेट्टीवार यांची कन्या युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचे सुपुत्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केतन ठाकरे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनुराग भोयर, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मिथिलेश कन्हेरे यांच्यासह अनेक युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Nagpur Congress Protest)
नागपुरात राष्ट्रीय अध्यक्ष व सरचिटणीस तसेच प्रदेश व काँग्रेस अध्यक्ष यांच्या उपस्थितीत रविवारी युवक काँग्रेसने नागपुरात संघ मुख्यालयावर धडक देत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध आंदोलन अचानक पुकारले. माध्यमांना तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनीही माहिती नव्हती. साहजिकच या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह काही मोजकेच पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. अनेकांनी या आंदोलनाला दांडी मारली. (Nagpur Congress Protest)
अशावेळी केवळ 50 -60 कार्यकर्त्यांसोबत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना काँग्रेसच्या देवडीया काँग्रेस भवन येथून संघ मुख्यालयाकडे निघण्याची वेळ आली. अखेर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यालयासमोरच रोखून धरले. आणि संघ मुख्यालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. एकंदरीत युवक काँग्रेसचे हे फसलेले आंदोलन दिल्ली दरबारी पोहोचले. त्यामुळेच तडकाफडकीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील 60 पदाधिकाऱ्यांना पदावरून तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.