नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील दंगल, अटकेतील आरोपींची संख्या शनिवारी १०५ वर पोहचली आहे. यात दहा अल्पवयीन मुलांचा समावेश असून अटकेतील लोकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सायबर पोलिसांनी सोशल मीडिया अकाउंट्सच्या चौकशीदरम्यान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनिअर आणि यूट्यूबर मोहम्मद शहजाद खान या दोघांना अटक केली. चौकशीत हिंसाचाराचे नियोजन सकाळीच झाल्याचे पुढे आल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. (Nagpur Violence)
शहर पोलिसांकडून सुरवातीला मोजक्याच लोकांना ताब्यात घेतले. आता पोलिसांनी गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी कोतवाली परिसरात भेट दिली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात डॉ. सिंगल यांनी शहरातील शांतता लवकर प्रस्थापित करण्यावर भर दिला. काल सहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी कायम केली गेली आता याबाबत शनिवारी पुन्हा विचार होण्याचे संकेतही बैठकीत दिले. महालमध्ये हिंसाचारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्राथमिक मुल्यांकणात ६१ वाहनांचे नुकसान झाले.
हंसापुरीमध्ये १७ मार्च रोजी हिंसाचाराची घटना घडली. हिंसाचार पसरवण्यात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही पोलिसांना आढळून आले. तेव्हापासून पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलिस सोशल मीडिया अकाउंटची सातत्याने चौकशी करीत आहेत.यातूनच आरोपी वाढण्याची शक्यता आहे. हमीद आणि शहजाद यांना याच माध्यमातून अटक करण्यात आली.
१७ मार्च रोजी सकाळी हमीद इंजिनिअरने मुजाहिदीनसाठी देणग्या गोळा करण्याचे आवाहन केले होते. त्याला विचारले असता, त्याने गाझाच्या लोकांसाठी देणग्या गोळा करत असल्याचे सांगितले. हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान हा हमीदच्या पक्षाचा नेता आहे. यावरून असे दिसून येते की हमीदने हिंसाचारातही महत्त्वाची भूमिक बजावली होती. त्याचप्रमाणे, शहजाद खान हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खान याचे वक्तव्य प्रसारित केले होते.