

नागपूर : नागपुरात सोमवारी 17 मार्च रोजी औरंगजेबाच्या कबरीवरून झालेले आंदोलन आणि नंतर प्रत्युत्तरात दगडफेक, जाळपोळ आणि उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि त्याचा सहकारी मोहम्मद शहजाद खान अशा दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
हमीदने प्रक्षोभक भाषण केले तर मोहम्मद याने युट्युबर पत्रकार म्हणून या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याचे पुढे आले आहे. एमडीपीचा शहर अध्यक्ष फईम शमीम खान सध्या प्रकृतीचे न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला गणेशपेठ पोलिसांनी आधीच अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत १०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून त्यांना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत सहा गुन्हे दाखल होते आता ती संख्या 13 वर पोहोचली आहे. सर्व गुन्ह्यांची बारकाईने तपासणी केली जाणार असून यामागे कुठल्या शक्ती, संघटना आहेत, त्याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी शुक्रवारी दिली.
मध्यरात्री उशिरापर्यंत या आरोपींबाबत न्यायालयीन सुनावणी सुरू होती. अटकेतील फईम खानने केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर लोकसभा मतदारसंघातून मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी अर्थात एमडीपीच्या वतीने निवडणूक लढविली होती. सोमवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर दिवसभर महाल गांधी गेट शिवतीर्थ परिसरात आणि शेजारच्या चिटणीस पार्क, भालदारपुरा हंसापुरी येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. यावेळी प्रक्षोभक भाषण करून जमावाला चिथावणी देण्याचे काम फईम खानने केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.