राजेंद्र उट्टलवार
नागपूर- सोलर पॅनलद्वारे रात्रीला देखील आता विद्युत ऊर्जा निर्मिती शक्य होणार आहे. एलईडी दिव्याच्या माध्यमातून रात्रीला सोलर पॅनलद्वारे विद्युत निर्मिती करणारे नाविन्यपूर्ण संशोधन करीत वैदर्भीय संशोधकांनी युके डिझाईनचे नोंदणी प्रमाणपत्र देखील प्राप्त केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय जानराव ढोबळे व लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विजय पावडे यांचा संयुक्तपणे या नाविन्यपूर्ण संशोधन कार्यात मोलाचा सहभाग आहे.
वाढती गरज लक्षात घेता, नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत मर्यादित असल्याने कृत्रिमरीत्या ऊर्जेची निर्मिती आपणास कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. यामुळेच आज घरोघरी सोलर पॅनल विद्युत ऊर्जा निर्मितीवर भर दिला जात आहे. शासनाच्या सबसिडी आणि विविध सुविधा असल्याने बहुतांश घरावर सोलर पॅनल आज लागलेली दिसतात. त्या परिवाराचे विजेचे बिल देखील यामुळे शून्यावर आल्याचे दाखले दिले जातात.
सोलर पॅनल आता बायफेशियलच्या रूपात यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोलर पॅनल दोन्ही बाजूंनी सूर्याच्या प्रकाशात फोटाॅन मिळवितात. यामध्ये सोलर पॅनलचा वरील भाग सूर्य प्रकाशाच्या प्रत्यक्ष रूपात संपर्कात येतो, तर खालील भाग परिवर्तित रूपात संपर्कात येतो. त्यामुळे सोलर पॅनल दोन्ही बाजूंनी फोटॉनद्वारे ऊर्जेची निर्मिती करतात. मात्र, सूर्यप्रकाश कमी झाल्यावर यामध्ये ऊर्जा निर्मिती मंदावते आणि अपेक्षित त्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती होत नाही. यावर डॉ. संजय ढोबळे व डॉ विजय पावडे यांनी संयुक्तपणे संशोधन करीत सोलर पॅनलच्या खाली व वरच्या भागावर एलईडी दिवे लावले.
एलईडी दिवे हवेच्या माध्यमाने पवन ऊर्जेद्वारे निर्मित झालेली ऊर्जा साठवून ठेवतात व सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाली की एका सेंसरद्वारे दोन्ही बाजूंनी लावलेले एलईडी दिवे प्रकाश देऊ लागतात. त्यामुळे कृत्रिम प्रकाशात सोलर पॅनल पुन्हा रात्रीच्या वेळी देखील ऊर्जामय होतात. एकंदरीत रात्रं-दिवस सोलर पॅनलद्वारे ऊर्जा निर्मिती करणे शक्य होणार असल्याने भविष्यात सोलर पॅनल ऊर्जा निर्मितीला अधिकच चालना मिळणार आहे.
संशोधकांच्या या पूर्ण प्रक्रियेमध्ये बाहेरून ऊर्जा न घेता स्वतः या प्रयोगाद्वारे ऊर्जेची निर्मिती होते. शासनाद्वारे विद्युत ऊर्जा प्रत्येक घरी, उद्योगाला व रस्त्यावरील दिव्यांना प्राप्त होईल, तेव्हाच हे संशोधन समाजपयोगी म्हणून ओळखले जाईल, असे मत डॉ. ढोबळे यांनी व्यक्त केले. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खंडाळ, विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, तसेच लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. अतुल वैद्य व कुलसचिव डॉ. निरज खटी यांनी या दोन्ही संशोधकांचे अभिनंदन केले.