नागपूर : नागपूर पोलिसांकडून १९ ऑक्टोबर २०२४ पासून 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत ‘मिशन एक्स’ या धाडसी मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ व तंबाखूजन्य वस्तूंविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. १६ ठिकाणी धाडीत २६ आरोपींना अटक करण्यात आली तसेच ४३ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या मोहिमेंतर्गत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनात २५ पोलिस अधिकारी आणि १२५ अंमलदार अशी एकूण १५० पोलिसांची १६ पथके तयार करण्यात आली. रस्त्यावरील प्रत्येक व्यक्तीला पोलिस स्टेशनला उद्देशून फक्त एक लिफाफा देण्यात आला. त्यानुसार आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी सर्व १६ ठिकाणी पथक धाडी टाकण्यासाठी रवाना झाले.
२७ मे रोजी ही कारवाई करण्यात आली. या धाडीत टेक्सास स्मोक शॉप, एक गोडाऊन आणि दोन पान मटेरियल दुकाने अशा एकूण १७ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये एकूण ३२ ठिकाणी झडती घेण्यात आल्या. १३ पोलिस ठाण्यात एकूण १६ गुन्हे दाखल करून २६ आरोपींवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ई-सिगारेट, हुक्का पॉट्स, हुक्का फ्लेवर्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. १६ ठिकाणांहून मोबाईल फोन, मोपेड वाहने, हुक्का साहित्य इत्यादींसह विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीत एकूण ४३ लाख ३७ हजार ४४८ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.