

जळगाव : शहरातील वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या चौफुल्यांवर पोलिस चौक्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्यापैकी इच्छा देवी मंदिराजवळील चौकीचे रूपांतर आता चहाच्या टपरीत झाल्यासारखे दिसत असून, अधिकाऱ्यांकडून याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
जळगाव शहर हे राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गांमुळे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरात मोठी एमआयडीसी असल्याने कालिका माता चौफुली, अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक, एमजी चौफुली, खोटेनगर, गुजरात पेट्रोल पंप अशा प्रमुख चौफुल्यांवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस चौक्या उभारण्यात आल्या आहेत.
इच्छा देवी मंदिराजवळ वसलेल्या जुन्या चौकीचे महत्त्व अधिक आहे, कारण त्यालगत झोपडपट्टी भाग आहे. मात्र, ही चौकी लहान पडत असल्यामुळे काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नवीन पोलिस चौकी उभारण्यात आली. त्यानंतर जुन्या इमारतीवर स्थानिकांनी अतिक्रमण करत चहाची टपरी थाटली आहे. त्यामुळे 'चौकी झाली चहाची टपरी' अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. प्रशासनाच्या अधिकृत जागेवर अतिक्रमण करून उघडपणे व्यवसाय सुरू आहे, मात्र नगरपालिका व पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
या बाबत संपर्क साधला असता, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी सांगितले की, "संबंधित पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले जाणार आहेत."