नागपूर- गेल्या काही वर्षात ऑनलाइन पेमेंट आपल्या सर्वांचे अंगवळणी पडले असले तरी नागपूरकरांनो दुचाकी,चार चाकी वाहन घेऊन घराबाहेर पडताय, मग कॅश खिशात घेऊनच निघा असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण येत्या 10 मे पासून नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट म्हणजेच फोन पे, गुगल पे, पेटीएम, डेबिट क्रेडिट कार्ड असे कुठलेही ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाणार नाहीत.
सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील रक्कम गोठविली जात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गौरव जयस्वाल यांनी दिली. देशभरात डिजिटल व्यवहार कोविड काळानंतर मोठ्या प्रमाणात वाढले.
मात्र याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत असून काही बनावट व्यवहारांमुळे पेट्रोल पंप मालक, चालकांच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे. काही प्रकरणात संपूर्ण बँक खाती गोठविण्यात आली आहेत. संबंधित खात्यातील रक्कम गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय परत मिळवता येत नाही.
विशेष म्हणजे ही प्रक्रिया अत्यंत अडचणीची असून सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दिल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळाले नाही यामुळे व्यवसायावरदेखील परिणाम होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दररोज वर्दळीच्या पेट्रोल पंपावर हजारो डिजिटल व्यवहार होतात. अशावेळी ग्राहक कुठल्या, कुणाच्या खात्यातून पैसे आम्हाला पाठवत आहेत, त्यांचा इतिहास काय आहे या विषयी माहिती घेणे पेट्रोल पंप चालकांना शक्य नाही.
प्रत्येक व्यवहाराची पडताळणी अशक्य असल्याने या कटू निर्णयातून ग्राहकांची कोंडी होणार असली तरीही हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रश्नाचे लवकरात लवकर समाधान न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल पेमेंट बंद करण्याचा विचार पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. अर्थातच ऑनलाइन पेमेंट अंगवळणी पडलेल्या ग्राहकांनो येणारे काही दिवस तुम्ही आपल्या खिशात रोख रक्कम ठेवायला सुरू करा, असाच सबुरीचा सल्ला देता येईल.