राजेंद्र उट्टलवार
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी अखेर भाजपने माजी जिल्हा अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना मोठी संधी दिली आहे. अनेकदा आमदारकीने त्यांना हुलकावणी दिली. यावेळी भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ लक्षात घेता त्यांचा विजय निश्चित मानला जातो. किंबहुना काँग्रेसचा अद्याप उमेदवारही ठरलेला नसल्याने काँग्रेसने ही निवडणूक अविरोध करावी, गटबाजी टाळावी असा सबुरीचा सल्ला देखील भाजपने दिला आहे.
आता काँग्रेस कुणाला हात देणार हे आज उघड होणार आहे. एकप्रकारे जिल्ह्यातील कलमेश्वर येथे रुग्णसेवा करणारे डॉ. पोतदार यांना आता खऱ्या अर्थाने जनसेवा करण्याची संधी आहे. गेले काही दिवस त्यांनी संघटनात्मक जबाबदारी सांभाळतानाना अनेकांना आमदार केले. मात्र पक्षाने विधानसभेला उमेदवारी देऊनही त्यांना निवडून येता आले नाही.
मध्यंतरी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पोतदार यांना संधी द्या अशी विनंती पक्षनेतृत्वापुढे केली होती. आता त्यांना संधी मिळाली आहे. सावनेरचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी त्यांच्या विजयाचा संकल्प बोलून दाखविला. दुसरीकडे काँग्रेसने माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर जबाबदारी टाकल्याने त्यांच्याच गटाचा उमेदवार असण्याची शक्यता बळावली आहे. एकंदरीत पुन्हा एकदा भाजप आणि सुनील केदार असा सामना नागपूर जिल्ह्यात रंगणार आहे.