Nagpur Crime News  
नागपूर

Nagpur Crime News | नागपुरात खळबळ! खैरी पुलाजवळ आढळला कुजलेला मृतदेह; घातपाताचा दाट संशय

Nagpur Crime News | अनोळखी इसमाचा खून करून मृतदेह फेकला? नवीन कामठी परिसरात भयावह दृश्य

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : शहरातील नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खैरी पुलाजवळील मोकळ्या जागेत बुधवारी दुपारी एका अनोळखी इसमाचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृतदेहाची अवस्था अत्यंत संशयास्पद असल्याने या प्रकरणात खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सदर मृतदेह साधारणपणे पाच दिवसांपूर्वीचा असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. तसेच भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे काही भाग ओरबाडल्याचेही दिसून आले.

या भयावह स्थितीमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, संबंधित व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह या निर्जन ठिकाणी टाकण्यात आला असावा, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, एपीआय सचिन यादव तसेच त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून त्याबाबत तपास सुरू आहे.

दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल आणि त्यानंतर पुढील गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT