NMC Election Campaign
राजेंद्र उट्टलवार
नागपूर: येत्या 15 जानेवारीरोजी होऊ घातलेल्या मनपा निवडणूक अंतर्गत 38 प्रभागातील 151 नगरसेवकांसाठी प्रचार आता अंतिम टप्प्यात आल्याने उमेदवारांची दमछाक होत आहे. निवडणूक खर्च मर्यादा आयोगाने वाढवून दिली असताना राजकीय पक्षांकडून वारेमाप खर्च, जेवणावळी जोरात आहेत.
काही अपक्ष, बंडखोर देखील सर्व शक्ती पणाला लावताना दिसत आहेत. शनिवारी सकाळ, सायंकाळ पदयात्रावर भर दिला जात असताना दिसला. उद्या रविवार हा सुपर संडे असल्याने रॅलींची धामधूम शहरात ठिकठिकाणी पहायला मिळणार आहे. भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांसाठी सध्या केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी तीन चार प्रभाग मिळून प्रचार सभा घेत आहेत.
शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचा रोड शो होणार असल्याने तो या निवडणुकीचा मास्टर स्ट्रोक असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार विदर्भात येऊन गेले असले तरी त्यांची अद्याप नागपुरात सभा झालेली नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण येऊन गेले. माजी प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कधी नागपूर तर कधी अमरावती असे बाहेरच्या दौऱ्यावर आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्व उमेदवारांना एकत्रित मार्गदर्शन केले. शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, अभिजित वंजारी आणि स्थानिक नेते, पदाधिकारी काँग्रेसचा मोर्चा सांभाळत आहेत. आमचा कार्यकर्ता हाच स्टार प्रचारक असल्याचे ते सांगतात. भाजपच्या तुलनेत काँग्रेसला बंडखोरीचा त्रास कमी आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांसाठी राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांच्या जाहीर सभा आहेत.
दुसरीकडे आप उमेदवारांसाठी दिल्ली विधानसभेच्या माजी उपाध्यक्ष माजी मंत्री राखी बिडलान आज येत आहेत. गेल्यावेळी भाजपला 108 जागा तर काँग्रेसला 29 जागी विजय मिळाला. यावेळी भाजपचे 120 तर काँग्रेसचे मिशन 100 नगरसेवक लक्ष्य आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीत बसपा 10, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1,अपक्ष 1असे एकंदर संख्याबळ होते. आता सारेच पक्ष स्वतंत्र मैदानात उतरल्याने मतविभाजनात फायदा पुन्हा सत्ता मिळविण्यात भाजपचा होणार की काँग्रेस दाव्यानुसार परिवर्तन घडवणार हे 16 जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे.