NMC Election News
राजेंद्र उट्टलवार
नागपूर : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची मंगळवारी सांगता झाली. महायुती, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करीत निवडणूक रिंगणात उतरलेले व अपक्ष उमेदवार या सर्वांनी दहा दिवस प्रचाराच्या रणधुमाळीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला़. १५ जानेवारीला मतदान आणि 16 रोजी लगेच मतमोजणी असल्याने पुढील तीन दिवस उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, समर्थकांचे मतदान केंद्र आणि नंतर मतमोजणी केंद्र परिसरात जागते रहो... पहायला मिळणार आहे.
विदर्भात नागपूरसोबतच अमरावती, अकोला आणि चंद्रपूर महापालिकेसाठी निवडणूक होत आहे. मंगळवार, १३जानेवारी हा प्रचाराचा शेवटचा दिवस होता़. शेवटच्या दिवशी बहुतांश उमेदवारांनी रॅली, जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला़. उपराजधानीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बाइक रॅली, रोड शो आज लक्षवेधी ठरली़.
एकीकडे प्रचाराचे भोंगे शांत झाले असलेत तरी आता खऱ्या अर्थाने गनिमी काव्याने प्रभागात प्रचार सुरू झाला आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी शक्तीप्रदर्शनावर भर दिला़. शहरात सायंकाळपर्यंत सर्वत्र वाहतूक कोंडीही बघायला मिळाली़. रॅली सोबतच आज ठिकठिकाणी जाहीर सभा देखील घेण्यात आल्या़. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्य नागपुरात जाहीर सभा घेतल्या.
प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांद्वारे एकीकडे सायंकाळपर्यंत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू होता, तर दुसकीकडे समर्थक व कार्यकर्त्यांद्वारे ठिकठिकाणी लावण्यात आलेले प्रचाराचे बॅनर, पक्षाचे झेंडे काढण्याचे कामही सुरू होते. ठिकठिकाणी रात्री पोलिसांची नाकाबंदी दिसली. वाहनांची तपासणी सुरू होती. दोन दिवस निवडणूक यंत्रणा, प्रशासनाचे लक्ष राहणार आहे़ तसेच विविध पक्षांद्वारे व उमेदवारांद्वारे आपल्या विरोधी उमेदवाराच्या व त्यांच्या समर्थकांच्या हालचालीवरही लक्ष ठेवले जात आहे़. कुठे पैशाचे, दारुचे वाटप तर होत नाही ना यावर सर्वांचेच लक्ष राहणार आहे़.