Nagpur Municipal Corporation
नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील २०० खेळांच्या मैदानांच्या सर्वांगीण विकास केला जाणार आहे. नागरिकांना सर्व सोयीसुविधायुक्त क्रीडा मैदाने उपलब्ध व्हावी, यासाठी महापौर निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.
यावेळी शहरातील मैदानांचा विकास संबंधित क्रीडा संघटनांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनांनुसार करण्याचा मानस महापौरांनी यावेळी व्यक्त केला. बैठकीत मैदानांच्या विकासासाठी आवश्यक नियोजन, अंदाजपत्रक, विविध खेळांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा तसेच भविष्यातील विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुला-मुलींसाठी दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. इंडोर आणि आऊटडोअर खेळांच्या गरजेनुसार आवश्यक सुविधा विकसित करण्यात येतील. प्रत्येक मैदानाची क्षमता, उपलब्ध जागा आणि संबंधित झोनचा विचार करून त्या मैदानावर कोणत्या खेळासाठी सुविधा विकसित करता येतील, याबाबत क्रीडा संघटनांनी आपल्या सूचना सादर कराव्यात, असे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार संदीप जोशी यांनी क्रीडा मैदाने तयार करण्यासह मनपाने क्रीडा धोरण सुनिश्चित करण्याची सूचना केली. यावेळी कुस्ती, बास्केटबॉल, तायक्वांदो, एथलेटिक्स आर्चरी, सायकलिंग, पिकलबॉल, बॅडमिंटन, कबड्डी, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, जलतरण, बॉक्सिंग, आट्यापाट्या आदी विविध खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
क्रीडा संघटनेच्या प्रतिनिधींनी मैदानांमध्ये उच्च दर्जाची प्रकाश व्यवस्था, प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम, पार्किंग, सीसीटीव्ही यंत्रणा, डिजिटल स्क्रीन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच एकाच मैदानात तीन ते चार खेळ खेळता येतील, अशा बहुउद्देशीय स्वरूपात मैदानांचा विकास करण्यात येणार आहे.
बैठकीत स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते तथा विशेष समिती अध्यक्ष नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, माजी आमदार संदीप जोशी, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, नगरसेवक श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अंकित, मुरुगानंथम एम., मिलिंद मेश्राम आदीसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.