Nagpur 24.83 lakh voters
नागपूर: येत्या 15 जानेवारी रोजी नागपुरातील 24 लाख 83 हजार 112 मतदार आपले प्रभागातील भावी नगरसेवक निवडणार आहेत. या माध्यमातून उपराजधानीचा नवा महापौर कोण हे निश्चित होणार आहे.
गेले साडेतीन वर्षे यासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याने सर्वच पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. शहरात 3167 मतदान केंद्र या मनपा निवडणुकीसाठी राहणार आहेत. मनपा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी घोषणा केल्यानंतर आज मंगळवारी मनपा आयुक्त प्रशासक अभिजीत चौधरी यांनी नागपूर महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात पत्र परिषदेत माहिती दिली.
12 लाख 26 हजार 690 पुरुष तर बारा लाख 56 हजार 166 महिला आणि 256 इतर मतदार या प्रकारे एकंदर 24 लाख 83 हजार 112 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी अधिकारी,कर्मचारी, पोलीस असे सुमारे अठरा हजारावर मनुष्यबळ या निवडणुकीसाठी लागणार आहे. 1 जुलै 2025 ची मतदार यादी या निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.
आज पासून दोन-तीन प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी संबंधित झोनल कार्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व उमेदवारांना ऑफलाईन अर्ज भरायचे असून 3 जानेवारी रोजी अपक्ष उमेदवार यांना निवडणूक चिन्ह वाटपासोबतच अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. पर्यायाने यानंतरच्या 11 दिवसात उमेदवारांना प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर लगेच 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्याने नप निवडणूक निकालासाठी स्ट्राँग रूममोर द्यावा लागणारा कार्यकर्त्यांचा खडा पहारा नसणार आहे.