Chandrashekhar Bawankule Pudhari
नागपूर

Nagpur News | काँग्रेसकडे उमेदवार निवडून आणण्याची क्षमताच नव्हती

काँग्रेसकडे बहुमत असते तर भाजपनेही उमेदवार मागे घेतला असता, असे त्यांनी सांगितले

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : चंद्रपूर, यवतमाळ आणि भंडारा येथे भाजपकडे भरीव मतदान असताना काँग्रेसच्या नेत्यांकडे आपले उमेदवार निवडून आणण्याची क्षमता नसल्याचा दावा केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचे, भाजपने दबावाचे राजकारण केल्याचे आरोप फेटाळले. 

ज्या ठिकाणी एखाद्या पक्षाकडे स्पष्ट बहुमत आहे, तेथे अनावश्यक निवडणूक लढवून पंधरा दिवस आचारसंहिता वाढविण्याची आणि विकासकामे खोळंबविण्याची गरज नसते. त्यामुळे निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी भाजपची भूमिका होती. काँग्रेसकडे बहुमत असते तर भाजपनेही उमेदवार मागे घेतला असता, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करताना त्यांनी चंद्रपूर, यवतमाळ आणि भंडारा येथे भाजपकडे भरीव मतदान असताना काँग्रेसला आपले उमेदवार निवडून आणण्याची क्षमता नव्हती, असा दावा केला. भाजपकडे ७०० पैकी सुमारे ५०० मतदारांचा पाठिंबा असताना निवडणूक का सोडायची?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी विनाकारण आरोप करू नयेत, असेही ते म्हणाले.

अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या राजकीय भूमिकेबाबत विचारले असता, त्या जो निर्णय घेतील तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल आणि त्याबाबत भाजपला कोणताही आक्षेप नसल्याचे  स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीत कॉंग्रेसने निवडणूक टाळावी, अशी विनंती विरोधी पक्षांतील नेत्यांना केली होती. काँग्रेसने उमेदवार उभा केल्याने त्यांच्याच मतांत फूट पडेल, असा दावा त्यांनी केला. निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांचे त्यांनी पुन्हा आभार मानले.

५० लाख कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत बावनकुळे म्हणाले की, आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासन देत आहे. राज्यभर सुरू असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज अभियान’ अंतर्गत ५० लाख कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ओबीसी उपसमितीची बैठक घेऊन सविस्तर अभ्यास 

मराठा समाजाला ओबीसींसारख्या सवलती देण्यासंदर्भातील शासन निर्णयाबाबत बोलताना बावनकुळे यांनी ओबीसी उपसमितीची बैठक घेऊन या निर्णयाचा सविस्तर अभ्यास केला जाईल, असे सांगितले. "ओबीसी समाजाच्या वाट्यातील सवलती कमी करून त्या इतरांना देण्याच्या बाजूने आम्ही नाही. अभ्यासानंतर ओबीसींना अन्याय होत असल्याचे आढळल्यास हा विषय सरकारसमोर मांडला जाईल, असे त्यांनी नमूद केले. यासंदर्भात तायवाडे, हाके यांच्यासह विविध ओबीसी नेत्यांशी चर्चा केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठा विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कॅबिनेट उपसमितीच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याचे सांगितले. ओबीसी समाजालाही आवश्यक त्या सवलती वाढविण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करणारी विधाने टाळावीत. काँग्रेसने सत्तेत असताना अनेक चुकीच्या गोष्टी केल्या आहेत.

आम्ही अशा प्रकारचे राजकारण केलेले नाही.  बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीवर टीका केली. त्यांच्या सरकारने "डुप्लिकेट कर्जमाफी" केली होती, तर महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी खरी आणि प्रभावी कर्जमाफी दिली आहे. कर्जमाफीबाबत सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले असून ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. रोहित पवार यांनी उपोषण,आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार असल्याचे सांगत सरकारने प्रत्यक्ष कर्जमाफीची अंमलबजावणी केल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT