नागपूर - नागपूरमधील खामला प्रतापनगर परिसरातील सह दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी अ. तु कपले यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कार्यालयात विविध तक्रारीनंतर अचानक पाहणी केली होती. सह दुय्यम उपनिबंधक वर्ग २ कार्यालयात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर महसूल विभागाने अ. तु. कपले या अधिकाऱ्याला (उपनिबंधक) गैरप्रकारात सहभागी असल्याच्या प्राथमिक चौकशीनंतर निलंबित केले.
नागरिकांकडून नोंदणीसाठी दलालांच्या माध्यमातून 5 ते 8 हजार अनधिकृत रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी विभागाकडे आल्या होत्या. अ. तु. कपले या अधिकाऱ्याच्या (उपनिबंधक) टेबलमधील ड्रॉवरमध्ये पाच हजार रोख रक्कम आढळून आली. याबाबत पालकमंत्र्यांनी पोलिसांना योग्य तो तपास करण्याचे निर्देश दिल्यानंतर कपले यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चा नियमांचा भंग केला असल्याचे पुढे आले.