Odisha to Nagpur ganja smuggling
नागपूर : अंमली पदार्थ विरोधी टास्कफोर्सने नागपूर ग्रामीणमध्ये तब्बल अडीच कोटींचा गांजा जप्त करीत एकाला अटक केली. संजय मदन यादव (वय ४८, रा. बिकायपूर, जि. गया, बिहार) असे या आरोपीचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी टास्कफोर्सने मानकापूर परिसरात एका गांजा तस्कराला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने ओडिशाहून मौदामार्गे विविध ठिकाणी गांजा जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर टास्कफोर्सने मौद्यातील माथनी टोल नाका परिसरात पाळत सुरु केली. सोमवारी पहाटे पथकाला टोलनाक्याजवळील आर्यन ढाब्याजवळ डब्ल्यू-२३-डी-७९९२ या क्रमांकाचा ट्रक संशयास्पद स्थितीत उभा दिसल्याने पथकाने या ट्रकला घेराव घालून चालक संजय याला ताब्यात घेतले.
ट्रकच्या झडतीत एका कोपऱ्यात निळ्या रंगाची बांधलेली ताडपत्री आढळली. पथकाने ती उघडली असता त्यामध्ये 507 किलो गांजाची ४९५ पाकिटे आढळली. २ कोटी ५३ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा हा गांजा पथकाने जप्त केला. अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून संजय याला अटक केली. हा गांजा ओडिशातून आणल्याचे संजय सांगत असला तरी तो कुठे आणि कोणाला पोहोचविणार होता, याबाबत मात्र त्याने मौन धरल्याने तपासाचे आव्हान कायम आहे.