नागपूर: 'इडा, पीडा घेऊन जा गे मारबत...' या पारंपरिक घोषणेसह सामाजिक अन्यायावर आसूड ओढणाऱ्या बडग्यांच्या गजरात, नागपूरची ऐतिहासिक मारबत मिरवणूक आज (शनिवारी) लाखो नागरिकांच्या उपस्थितीत प्रचंड उत्साहात पार पडली. पोळ्याच्या पाडव्याला निघणाऱ्या या मिरवणुकीने देशाचे हृदयस्थान असलेल्या नागपूरचा सांस्कृतिक वारसा पुन्हा एकदा अधोरेखित केला.
यावर्षी पिवळ्या मारबत उत्सवाचे हे १४४ वे वर्ष होते. या उत्सवात महागाई, अन्यायकारक स्मार्ट वीज मीटर, व्यसनाधीनता आणि एमडी ड्रग्जचा तरुणाईला बसलेला विळखा यांसारख्या ज्वलंत विषयांवर बडग्यांच्या माध्यमातून जोरदार प्रहार करण्यात आला. यासोबतच, पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही धोरणांवर टीका करणारे बडगेदेखील आकर्षणाचे केंद्र ठरले. नेहरू पुतळा परिसरात पिवळ्या आणि काळ्या मारबतीचे होणारे पारंपरिक मिलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. इतवारी शहीद चौक, चितार ओळ, बडकस चौक, महाल कोतवाली आणि गांधीगेट या मार्गांवरही आबालवृद्धांसह तरुणांचा जनसागर उसळला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात चार हजारांहून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
काय आहे मारबत उत्सवाचा इतिहास?
मारबत हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर तो सर्वसामान्यांच्या भावना आणि असंतोष व्यक्त करण्याचे एक सशक्त माध्यम आहे. इंग्रजांच्या जुलमी राजवटीला कंटाळून आणि स्वातंत्र्याच्या भावनेने प्रेरित होऊन १८८५ मध्ये तऱ्हाणे तेली समाजाने 'पिवळी मारबत' उत्सव सुरू केला. ही मारबत ब्रिटिश सत्तेचे प्रतीक मानली जात होती. तर, श्रीकृष्णाने वध केलेल्या पुतना मावशीचे प्रतीक म्हणून 'काळी मारबत' काढण्याची परंपरा आहे. काळ्या मारबतीचे हे १४५ वे वर्ष आहे.
नागपूरचे सांस्कृतिक वैभव
पिवळी मारबत तऱ्हाणे तेली समाजाकडून, तर काळी मारबत श्री देवस्थान पंचकमिटीतर्फे तयार केली जाते. या भव्य मूर्ती तयार करण्यासाठी सुमारे चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागतो. उत्सवाच्या आठवडाभर आधीपासून जागनाथ बुधवारी आणि इतवारी परिसरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मिरवणुकीच्या शेवटी या मारबतींचे दहन केले जाते, जे वाईट प्रवृत्तींच्या नाश्याचे प्रतीक मानले जाते.