नागपूर

e-rickshaw battery blast accident: धरमपेठमध्ये ई-रिक्षाच्या बॅटरीचा भीषण स्फोट; झोपेतून उठून रिक्षाकडे गेलेल्या चालकाचा मृत्यू

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : चार्जिंगवर लावलेल्या ई-रिक्षाच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाल्याने ५६ वर्षीय ई-रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गौतमनाथ रावल असे मृतकाचे नाव असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गौतमनाथ रावल यांचा मुलगा आणि इतर नातेवाईक एका लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. ८ जुलै रोजी रात्री गौतमनाथ यांनी त्यांची ई-रिक्षा चार्जिंगला लावली आणि ते झोपी गेले. दरम्यान, पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांना जाग आली. बॅटरी चार्ज झाली की नाही, हे पाहण्यासाठी ते ई-रिक्षाजवळ गेले. नेमक्या त्याच वेळी बॅटरीचा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत गौतमनाथ गंभीररित्या होरपळले.

उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

घटनेनंतर त्यांना तातडीने धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT