MSEDCL Cable Fault Detection Van Pudhari
नागपूर

Nagpur MSEDCL | भूमिगत वाहिन्यांतील बिघाड शोधणारी अत्याधुनिक 'केबल फॉल्ट डिटेक्शन व्हॅन' महावितरणच्या ताफ्यात

नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते नवीन वाहनाचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

MSEDCL Cable Fault Detection Van

नागपूर : नागपूर परिमंडलातील भूमिगत वीज वाहिन्यांमधील बिघाड शोधण्याचे काम अधिक पारदर्शक, अचूक आणि वेगवान करण्यासाठी महावितरणच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘केबल फॉल्ट डिटेक्शन व्हॅन’ समाविष्ट करण्यात आली आहे. या नवीन वाहनाचे लोकार्पण नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

हे वाहन म्हणजे जमिनीखालून गेलेल्या भूमिगत वीज वाहिन्यांमधील दोष शोधणारी एक फिरती अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे. परिमंडलाच्या विविध भागांत सौंदर्यीकरण आणि सुरक्षेच्या दृष्टीने भूमिगत वीज वाहिन्यांचे जाळे वेगाने विस्तारत असून, या वाहिन्यांमधील बिघाड शोधून दुरुस्त करण्याचे मोठे आव्हान महावितरणच्या कर्मचाऱ्यांसमोर असते. या तांत्रिक आव्हानावर मात करण्यासाठी ही नवीन व्हॅन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

सध्या सर्वत्र सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या खोदकामामुळे किंवा नैसर्गिक कारणांमुळे भूमिगत केबल्समध्ये बिघाड झाल्यास संपूर्ण रस्ता, रस्ता दुभाजक किंवा पदपथ खणणे अशक्य आणि त्रासदायक ठरते. अशा वेळी या चाचणी वाहनातील आधुनिक डिजिटल प्रणालीचा वापर करून जमिनीखालील बिघाडाचे नेमके ठिकाण काही मिनिटांतच शोधून काढले जाते. यामुळे तासनतास किंवा दिवसभर बिघाड शोधण्यात जाणारा वेळ वाचणार असून कमीत कमी खोदकामात दुरुस्तीचे काम पूर्ण करता येईल.

परिणामी ग्राहकांचा खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करणे शक्य होणार आहे. उन्हाळ्यातील वाढत्या विजेच्या मागणीमुळे येणारा ताण आणि पावसाळ्याच्या दिवसांत निर्माण होणाऱ्या शॉर्ट सर्किटच्या आपत्कालीन घटनांच्या वेळी ही व्हॅन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. याशिवाय, एकाच डक्टमध्ये अनेक केबल्स एकत्र असताना त्यातून नेमकी कोणती केबल खराब झाली आहे, हे अचूकपणे ओळखणे या वाहनातील उपकरणांमुळे शक्य होणार आहे. या नवीन वाहनाच्या समावेशामुळे नागपूर परिमंडलात ‘केबल फॉल्ट डिटेक्शन व्हॅन’ची संख्या दोन झाली अहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT