Nagpur Crime News
नागपूर: नागपुरातील महाल गांधीगेट परिसरात 17 मार्चरोजी झालेल्या दगडफेक, हिंसाचार, दंगल प्रकरणी 80 आरोपींची एकाचवेळी जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. नऊ जणांची अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने जामीनावर सुटका केली. उच्च न्यायालयाचे याच आदेशाचा आधार घेत सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. कुलकर्णी यांनी जामीन अर्ज मंजूर केले.
सत्र न्यायालयाच्या इतिहासात एकाच वेळी इतक्या लोकांना जामीन मिळण्याची पहिलीच घटना असल्याचे बोलले जाते. अद्यापही या दंगलीचा कथित सूत्रधार समजला जाणारा आणि न्यायालयीन कोठडीत असलेला फहीम खान याला अद्याप जामीन मिळालेला नाही. 4 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता आहे. हमीद इंजिनियरला सत्र न्यायालयातून जामीन मिळाला. तर दोघांना अटकपूर्व अंतरिम जामीन आणि नऊ जणांना उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. पोलिसांनी आम्हाला ठोस पुराव्याशिवाय अटक केली.
ओळख परेडमध्ये आमची ओळख पटली नाही. त्यामुळे जामीन मंजूर करण्याची विनंती आरोपींनी केली. न्यायालयाने प्रत्येकी एक लाख रुपये जात मुचलक्यावर हा सशर्त जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे अॅड. आसिफ कुरेशी, अॅड. रफीक अकबानी, अॅड. आश्विन इंगोले, अॅड. शहाबाज सिद्दिकी यांनी आरोपीतर्फे तर राज्य शासनातर्फे जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली.