सचिन घनश्याम आवारी  Pudhari
नागपूर

Railway Police Death Nagpur | गेट-टुगेदर ठरले जीवघेणे: उडी मारताना डोक्याला मार; स्विमिंग पूलमध्ये रेल्वे पोलिसाचा मृत्यू

२०१३ च्या जीआरपी बॅचमधील नऊ मित्रांवर दुःखाचा डोंगर

पुढारी वृत्तसेवा

Kuhi Swimming Pool Incident

नागपूर : गणेशोत्सवानंतर गेट-टुगेदर करण्यासाठी एकत्र आलेल्या २०१३ च्या जीआरपी बॅचमधील नऊ पोलिस मित्रांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना डोक्याला जोराचा मार लागल्याने रेल्वे पोलीस दलातील सचिन घनश्याम आवारी (३८, रा. गायत्री नगर, सचिन लेआऊट, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, नागपूर) यांचा मृत्यू झाला. ही घटना कुही तालुक्यातील मौजा सोनेगाव शिवारातील बाल गिरी फार्म येथे ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली.

सन २०१३ मध्ये जीआरपी रेल्वे पोलीस दलात एकत्र भरती झालेले राहुल हरीचंद्र राजगिरे, विपीन पिलेवान, नितुल सावजी, शिवशंकर बिसेन, निलेश निकोडे, यशवंत गायकवाड, देवेंद्र राकेश, प्रतिक ईटनकर आणि सचिन घनश्याम आवारी हे नऊ मित्र दरवर्षी गेट-टुगेदरसाठी एकत्र येत होते. यंदाही गणेशोत्सवाच्या विसर्जनानंतर गेट-टुगेदर करण्याचे त्यांनी नियोजन केले होते.

त्यानुसार सर्व नऊ मित्र तीन चारचाकी वाहनांतून रात्री सुमारे ९ वाजता नागपूरहून निघाले. रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास ते कुही तालुक्यातील सोनेगाव शिवारातील बाल गिरी फार्म येथे पोहोचले. तेथे सर्वांनी मिळून जेवण तयार केले. जेवणानंतर मित्र स्विमिंग पूलमध्ये पोहत गप्पागोष्टी व मौजमजा करीत होते.

दरम्यान, रात्री १.३० ते १.४५ वाजण्याच्या सुमारास सचिन आवारी यांनी स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. यावेळी त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच कुही पोलिसांनी नोंद घेतली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT