कोराडी तलावाचे शुद्धीकरण, खोलीकरण आणि सुशोभीकरण करून त्याचे अत्याधुनिक पर्यटन केंद्रात रूपांतर करण्यात येणार  Pudahri
नागपूर

Nagpur Koradi Lake | कोराडी तलावाचे अत्याधुनिक पर्यटन केंद्रात रूपांतर; देशातील सर्वात उंच हनुमान मूर्तीचे लवकरच लोकार्पण

तलाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी व्यापक पुनर्विकास आराखडा तयार

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Koradi Lake Transformation

नागपूर : नागपूरजवळील कोराडी येथील महाजेनकोच्या २७२ हेक्टर क्षेत्रफळाच्या तलावाचे शुद्धीकरण, खोलीकरण आणि सुशोभीकरण करून त्याचे अत्याधुनिक पर्यटन केंद्रात रूपांतर करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

कोराडी तलाव परिसराची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णी आणि गाळ साचल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले होते. त्यामुळे तलाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी व्यापक पुनर्विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार हा तलाव एमएमआरडीएकडे सुपूर्द करण्यात आला असून त्याच्या देखभालीची जबाबदारीही एमएमआरडीएवर राहणार आहे. महाजेनकोकडून वीज निर्मितीसाठी या तलावातील पाण्याचा वापर सुरू राहणार असून वापरानंतरचे पाणी पुन्हा तलावात सोडण्यात येणार आहे.

तलावाच्या पुनर्विकासासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच नीरी (NEERI) संस्थेच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. भविष्यात जलपर्णीचा प्रश्न उद्भवू नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या परिसरात हाउसबोट्स, रेस्टॉरंट्स, बोटिंग सुविधा तसेच बोटीच्या माध्यमातून हनुमान मंदिर दर्शनाची सुविधा विकसित करण्याची योजना आहे. याच परिसरातील देशातील सर्वात उंच हनुमान मूर्तीचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. बेससह १९१ फूट उंच आणि प्रत्यक्ष १६३ फूट उंचीची ही मूर्ती भाविकांसाठी लवकरच खुली केली जाणार आहे.

नागपूरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर वॉटर स्पोर्ट्स, स्कायवॉक आणि इतर पर्यटन प्रकल्पांमुळे विदर्भातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राजकीय टीकाटिप्पणी करताना बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील संभाव्य घडामोडींवर प्रतिक्रिया देताना त्यांनी “बुडत्या जहाजात कोणीही बसणार नाही,” अशी टीका केली. काँग्रेसमध्ये घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचे वातावरण असून पक्षाची अवस्था ढासळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संभाव्य निर्णयांबाबत बोलताना ते म्हणाले की, “राजकारणात जर-तरला स्थान नाही, परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात.” तसेच एनडीए आगामी काळातही मजबूत राहील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ५१ टक्क्यांपर्यंत मते मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT