नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे जुन्या वादातून रविवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात तलवारी, कोयते, चाकू आणि काठ्यांचा वापर करण्यात आला. या हल्ल्यात अनेक युवक जखमी झाले असून, खापरखेडा पोलिसांनी ६ नामजद आरोपींसह १० ते १२ अज्ञात साथीदारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून वार्ड क्रमांक २ मध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल प्रदीप जाने (वय १८) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रविवारी रात्री सुमारे ९.३० वाजता प्रज्वल हा त्याचे मित्र हिमांशू कडू, रक्षित कापसे, रोहित मेश्राम, सिद्धांत सातनकर आणि पुनीत भगत यांच्यासह नागमंदिर चौकात उभा असताना आरोपींचा गट तेथे आला.
आरोपींनी सुरुवातीला कोयता फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर तलवारी, चाकू आणि काठ्यांनी बेछूट हल्ला चढविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हल्लेखोरांनी हिमांशू कडू याच्यावर त्याच्या घराजवळ जीवघेणा वार केला. तसेच मुख्य रस्त्यावरील चहाच्या टपरीजवळ रोहित मेश्राम आणि रक्षित कापसे यांनाही लक्ष्य करत मारहाण करण्यात आली. जीव वाचविण्यासाठी त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी सूरज कावळे, संघर्ष बागडे, साहिल बागडे, शुभम उईके, सुदामा उर्फ डहाके यांच्यासह १० ते १२ अज्ञात साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमे, शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याने वार्ड क्रमांक २ मध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व नामजद आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास खापरखेडा पोलीस करीत आहेत.