Nagpur Vanrai bandhara
नागपूर : वनराई बंधाऱ्याचा नागपूर पॅटर्न हा राज्यात ओळखला जातो. महाराष्ट्र समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून काटोल तालुक्यातील खापरी बारोकर या गावात केवळ तीन तासांत ग्रामस्थांकडून श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. या वनराई बंधाऱ्यात 10 लाख लिटरपेक्षा जास्त पाणी साठविण्यात आले आहे. या बंधाराऱ्यासाठी सहाशे रिकाम्या आणि खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर केला आहे.
संत्रा या फळपिकासाठी प्रसिद्ध असलेल्या काटोल तालुक्यातील भु-गर्भातील पाण्याची पातळी सातत्याने कमी होत असल्यामुळे वनराई बंधाऱ्याच्या बांधकामाला प्राधान्य देण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासह शाश्वत सिंचनासाठी हा उपक्रम यशस्वी ठरत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात दोन वनराई बंधारे श्रमदानातुन बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
पावसाचा मुक्काम लांबल्यामुळे ग्रामीण भागातील नाले, ओढे तसेच नद्यांना पाणी उपलब्ध आहे. परंतू गावाचा शिवारतून वाहून जाणारे पाणी केवळ वनराई बंधाऱ्यामुळेच अडविणे सुलभ आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी अशा प्रकाराचे बंधारे उपयुक्त ठरू शकतात. या बंधाऱ्यामुळे 30 फुट बाय 5 फुट खोल व 250 फुट लांब क्षेत्रात पाण्याची साठवण झाली आहे. काटोल तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये 30 नोव्होंबर पर्यंत वनराई बंधाऱ्याची मोहीम राबविण्याचा संकल्प गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी व्यक्त केला.
सरपंच श्रीमती सुजाता बाळोकर गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, कृषी अधिकारी अनिल आडेवार, उपअभियंता गणेश गिरमकर, विस्तार अधिकारी उत्तम झेलगोंदे, सुरेश निहारे, संजय भक्ते, संजय जुनघरे आदी कर्मचारी व ग्रामस्थांनी वनराई बंधाऱ्याच्या निर्मितीमध्ये सक्रीय सहभाग घेतला.