कामठी येथील वारिसपुऱ्यातील आई-वडील अन् तरुण मुलावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले Pudhari
नागपूर

Nagpur News | नागपूर हळहळले : आई-वडील अन् तरुण मुलावर एकाचवेळी अंत्यसंस्कार

राजस्थानमध्ये झालेल्या भीषण अपघातात कामठीच्या वारिसपुरा येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Warispura Nagpur Family Accident

​नागपूर: आयुष्यभर गरिबीशी दोन हात केले. घाम गाळून संसाराचा गाडा हाकला... आणि जेव्हा सुखाचे चार दिवस जवळ आले, तेव्हा संपूर्ण कुटुंबासह तीर्थयात्रेला निघालेल्या पारसे कुटुंबाचा प्रवास रक्ताने माखलेल्या रस्त्यावर संपला. राजस्थानमध्ये झालेल्या भीषण अपघातात कामठीच्या वारिसपुरा येथील लोकशाहीर महादेव पारसे, त्यांच्या पत्नी कांताबाई आणि तरुण मुलगा घनश्याम या तिघांचा अंत झाला. शनिवारी (दि.१४) सकाळी जेव्हा या तिघांचे मृतदेह कामठी येथील वारिसपुऱ्यात पोहोचले, तेव्हा संपूर्ण कामठी शहरावर शोककळा पसरली आणि उपस्थित हजारो जणांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

स्वप्नांची यात्रा... संपली

​महादेव पारसे हे कामठीतील एका किराणा दुकानात कष्टकरी म्हणून काम करायचे. कष्ट उपसतानाही त्यांनी आपल्यातील 'लोकशाहीर' जिवंत ठेवला होता. डहाका मंडळाचे सक्रिय सदस्य असलेल्या महादेव यांना नुकतेच शासनाचे मानधनही सुरू झाले होते.

त्यांची दोन्ही मुले घनश्याम आणि तुषार, गणपतराव वस्ताद आखाड्याचे प्रशिक्षक म्हणून नाव कमवत होते. गरिबीच्या छायेतून बाहेर पडत असलेल्या या कुटुंबाने आयुष्यात पहिल्यांदाच बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन केले. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. ११ मार्चरोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास राजस्थानच्या डीडवाना परिसरात एका मद्यधुंद चालकाच्या बेजबाबदारपणामुळे पारसे कुटुंबाचे हसते-खेळते जग उद्ध्वस्त झाले. यात्रा मध्येच संपली.

आज मृतदेह येताच आई-वडील आणि भावाला गमावलेला तुषार हा स्वतः जखमी असूनही साश्रू नयनांनी या भीषण वास्तवाचा मूक साक्षीदार दिसला . चालक दारूच्या नशेत होता आणि त्याने आमच्या गाडीला समोरून उडवले," असे सांगताना तुषारचा कंठ दाटून आला होता.

यानंतर अत्यंत शोकमय वातावरणात अंत्ययात्रा कन्हान घाटाकडे निघाली. शहरातील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि नागरिक या दुःखात सहभागी झाले होते. ज्या आई-वडिलांनी कष्टातून मुलांना मोठे केले, त्यांच्याच सोबतीने तरुण घनश्यामवरही अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली. एकाच वेळी पेटलेल्या तीन सरणांनी नियतीच्या क्रूरतेची साक्ष दिली.

​या अपघातात चालक मनोज चिंदमवार यांच्यासह ७ जण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर कामठीच्या आशा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. श्रद्धा,भक्तीच्या मार्गावर निघालेल्या या कुटुंबाचा असा अंत व्हावा, या विचाराने आजही संपूर्ण कामठी हळहळत आहे.

आगळीवेगळी श्रद्धांजली

​मृतक घनश्याम आणि जखमी तुषार हे लाठी-काठीच्या कलेत निष्णात होते. आपल्या प्रशिक्षकाला अखेरचा निरोप देण्यासाठी गणपतराव वस्ताद आखाड्याचे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारिसपुरा भागात जेव्हा मृतदेह आणले, तेव्हा या खेळाडूंनी आखाड्याचे प्रात्यक्षिक सादर करून आपल्या लाडक्या प्रशिक्षकाला आणि त्यांच्या पालकांना मानवंदना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT