Imamwada Bus Depot Theft case  (AI Photo)
नागपूर

Nagpur Bus Theft | इमामवाडा आगारातील निष्काळजीपणाचा कळस; कर्मचारी झोपेत, सीसीटीव्ही बंद अन् बसच झाली चोरी

१४ कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि हायटेक व्यवस्था असूनही शिवाई ई-बस थेट अमरावतीपर्यंत; महामंडळाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

Imamwada Bus Depot Theft case

नागपूर : नागपूर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इमामवाडा बस आगारातून पहाटेच्या सुमारास शिवाई ई-बस चोरीस गेल्याच्या घटनेने महामंडळाच्या सुरक्षाव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. आगारात एक-दोन नव्हे तर तब्बल १४ कर्मचारी उपस्थित असताना बस सहजपणे बाहेर निघून गेली. त्यातच आगारातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचेही उघड झाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आधीच आर्थिक अडचणींना सामोरे जात असताना कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या सुरक्षेबाबतच दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे घटनेच्या वेळी इमामवाडा आगारात १४ शिवाई ई-बसेस आणि २५ लाल ई-बसेस उभ्या होत्या. एवढ्या मोठ्या संख्येने वाहने असताना देखरेखीसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, ही बाब अधिकच धक्कादायक मानली जात आहे.

माहितीनुसार, तेलंगणातील रंगारेड्डी गावातील विष्णू गणपती निलावार (२२) याने गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास चार्जिंगला लावण्यात आलेली शिवाई ई-बस (एमएच-४९-बीझेड-८२५८) इमामवाडा आगारातून बाहेर काढली. आरोपीने सुरक्षारक्षकाच्या डोळ्यात धूळफेक करत बस थेट अमरावतीच्या दिशेने पळविली.

विशेष म्हणजे सकाळी नऊ वाजेपर्यंत संबंधित बस आगारात परत न आल्याने सुरक्षारक्षक सुरेंद्र मिश्रा यांना संशय आला. त्यांनी तातडीने आगार व्यवस्थापक इमरान पटेल यांना फोनवर माहिती दिली. त्यानंतर आगार प्रशासनात एकच खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि बस शोधण्याची मोहीम सुरू झाली.

अखेर बसमध्ये बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टीमच्या मदतीने आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे अमरावती येथील राजापेठ परिसरात आरोपीला फिल्मी स्टाईलने अटक करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे चोरीस गेलेली बस सुरक्षित परत मिळविण्यात यश आले.

या प्रकरणात आणखी एक गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. नियमानुसार कोणतीही बस आगाराबाहेर जाताना प्रवेशद्वारावर तिची नोंद करणे बंधनकारक असते. मात्र, इमामवाडा आगाराच्या गेटजवळ गटार तुंबल्याने पाणी साचले होते आणि मुख्य गेट व्यवस्थित बंद होत नव्हते. ड्यूटीवर असलेल्या सुरक्षारक्षकांनी संबंधित बस ट्रायलसाठी बाहेर नेण्यात येत असल्याचा अंदाज व्यक्त करून कोणतीही नोंद न करता तिला बाहेर जाऊ दिले.

या घटनेमुळे महामंडळाच्या सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जबाबदारांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मास्टरमाईंड बसचोराचा धक्कादायक खुलासा

तपासादरम्यान आरोपी विष्णू निलावार याने धक्कादायक माहिती दिली आहे. त्याने तेलंगण, हैदराबाद, आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रातील नांदेड येथून मिळून आतापर्यंत तब्बल २१ बसेस चोरल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे 'चलो अमरावती' म्हणत त्याने चोरीच्या बसमध्ये काही प्रवाशांनाही बसविले होते. मात्र, पकडले जाण्याची भीती वाटल्याने आरोपीने पुढे प्रवाशांना वाटेतच उतरवून दिल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT