

नागपूर : महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती होताच गुटखा आणि पान मसाल्याच्या अवैध विक्री साखळीमध्ये खळबळ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात बंदी असतानाही चोरीच्या मार्गाने सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर कठोर कारवाईची शक्यता निर्माण झाल्याने विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे. या अवैध विक्रीवर चाप लावण्याचे आव्हान आता पोलिसांवर आहे.
नागपूरसह विदर्भातील अनेक शहरांमध्ये गुटखा आणि पान मसाल्याच्या किंमतींमध्ये अचानक वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. नागपूरमधील विविध भागांत १५ रुपयांना मिळणारा पान मसाला आता २० ते २५ रुपयांना विकला जात आहे. अमरावतीमध्ये याच उत्पादनाचे दर २५ ते ३० रुपयांपर्यंत पोहोचले असून अकोल्यात काही ठिकाणी ३० रुपयांपर्यंत दर वाढल्याचे सांगितले जात आहे.
या वाढीमध्ये रजनीगंधा, विमल, राजश्री, पराग आणि पान पराग यांसारख्या लोकप्रिय ब्रँडचा समावेश आहे. विदर्भात विविध भागांमध्ये ग्राहकांच्या पसंतीतही फरक दिसून येत आहे. पूर्व विदर्भात रजनीगंधाला सर्वाधिक मागणी असल्याचे चित्र आहे, तर पश्चिम विदर्भात पान पराग आणि काळी बहार यांची मागणी अधिक आहे. अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात विमलची मागणी लक्षणीय असल्याचे व्यापारी सांगतात.
दरम्यान, एका घाऊक विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात दररोज अंदाजे दीड ट्रक गुटखा आणि साडेतीन ट्रक सिगारेटचा पुरवठा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच एका व्यक्तीकडून सरासरी दिवसाला चार गुटखा पाकिटे आणि किमान तीन सिगारेटचे सेवन केले जात असल्याचेही त्याने सांगितले.
विशेष म्हणजे पावसाळा आणि हिवाळ्याच्या काळात सिगारेटच्या मागणीत वाढ होत असल्याचेही व्यापाऱ्यांकडून सांगितले जाते. FDA प्रशासनाच्या संभाव्य कठोर कारवाईमुळे आगामी काळात अवैध गुटखा व्यापाराला आळा बसणार का हे पहावे लागणार आहे.