Auto Driver Returns Bag
नागपूर : खरेदीसाठी गेलेल्या महिलेची सुमारे ४ लाख ७५ हजार रुपये किंमतीची बॅग सापडल्यानंतर ती कोणताही स्वार्थ न ठेवता पोलिसांच्या माध्यमातून संबंधित महिलेला परत करणाऱ्या ऑटोचालकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सचिन मोतीरामजी निखारे असे या प्रामाणिक ऑटोचालकाचे नाव असून, लकडगंज पोलिसांनी त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.
ममता नरेश यादव या शिक्षिका ३१ ऑगस्ट रोजी जुना मोठा स्टँड चौक, अमर टॉकीजसमोर खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांची बॅग हरवली. या बॅगेत १ लाख ७५ हजार रुपये रोख, दीड तोळ्याची सोन्याची अंगठी अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीची, ५० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि तीन एटीएम/डेबिट कार्ड असा एकूण सुमारे ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल होता.
याप्रकरणी ममता यादव यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून बॅगेचा शोध सुरू असतानाच १ सप्टेंबर रोजी ऑटोचालक सचिन निखारे यांना ही बॅग व त्यातील मुद्देमाल सापडला. त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत बॅग स्वतःकडे न ठेवता लकडगंज पोलिसांच्या माध्यमातून ती ममता यादव यांच्याकडे सुरक्षितपणे सुपूर्द केली.
सुमारे ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल परत मिळाल्याने यादव यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, सचिन निखारे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यदक्षतेची दखल घेत लकडगंज पोलिसांनी त्यांचा सत्कार करून प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.