नागपूरमधील सेंटर पॉईंट हॉटेलसमोर एका भरधाव ऑडी कारने अनेक कार आणि काही दुचाकींना धडक दिली. Pudhari Photo
नागपूर

नागपूर हिट अँड रन प्रकरण : ऑडी चालकाच्या वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी कार चालकाने मर्यादित मद्य सेवन केले होते, असे पुढे आल्यानंतर नागपुरातील ऑडी कारच्या हिट अँड रन प्रकरणात पुन्हा खळबळ उडाली आहे. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळू शकले नसताना आता कार चालकाने मर्यादित मात्रेत मद्य सेवन केल्याचा अहवाल पुढे आला आहे. त्यामुळे आता मध्य धुंद अवस्थेत वाहन चालवण्याचा गुन्हा मागे घेतला जाणार असल्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

दरम्यान, लाहोरीत बीफ मिळत नसल्याचा दावा करीत मालक समीर शर्मा यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याविषयीची चर्चा जोरात आहे. तर दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई व्हावी, या भूमिकेवर ठाम असल्याचे माध्यमांशी बोलताना अकोला येथे स्पष्ट केले आहे.

प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची चिन्हे

संकेत बावनकुळे यांच्या मालकीच्या या कारने रविवारी लाहोरी बार अँड रेस्टॉरंट येथून निघाल्यानंतर दोन कारसह विविध वाहनांना धडक दिली होती. यात काही जण जखमी झाले आहेत. या कारचा चालक अर्जुन जितेंद्र हावरे व रोनित चिंतमवार यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर ते मद्य प्राशन करून असले तरी त्यांनी मर्यादित प्रमाणातच सेवन केले असल्याचे अहवालात पुढे आल्यानंतर या अपघात प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत.

भाजप काँग्रेस हात मिळवणीचा सुषमा अंधारेंचा आरोप

लाहोरी बार मधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना अजूनही मिळू शकलेले नाहीत. त्यांनी जप्त केलेल्या डीव्हीआरवरून न्यायवैद्यक प्रयोगशाळेत याविषयीचा अधिक उलगडा होण्याची चिन्हे आहेत. सीसीटीव्ही बंद होते की सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आले. याविषयी देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप काँग्रेस हात मिळवणीचा आरोप यापूर्वीच केला आहे. त्यामुळे या अपघातातील चालक अर्जुन हावरे तसेच संकेत बावनकुळे यांना वाचवण्याचा पोलीस प्रयत्न करीत असल्याचा आरोप होण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT