Nagpur Hit and Run
नागपूर : कॅटरिंगचे काम आटोपून दुचाकीने घरी परतत असलेल्या दोन तरुणांच्या दुचाकीला भरधाव पिकअप वाहनाने धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ज्ञानेश्वर नगर गेट जवळील दुभाजक वळणावर मध्यरात्री हा अपघात झाला. नितीन राजेंद्र कटरे (१८) आणि कोमल भगवती यादव (१७, दोन्ही रा. बालाजीनगर, कळमना) अशी अपघातातील मृतकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन आणि कोमल हे दोघेही कॅटरिंगची कामे करत होते. गुरूवार, ५ जून रोजी कॅटरिंगची कामे आटोपून दोघेही एमएच ४९ / सीपी ०४८२ क्रमांकाच्या पल्सर दुचाकीने भरधाव घरी परत जात होते. मध्यरात्री रस्त्यावर वाहतूक कमी असल्याने इतर वाहनाकडे लक्ष नसल्याने भरधाव टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. दोघेही युवक त्यांच्या दुचाकीवरून उसळून रस्त्यावर आपटले. रक्ताच्या थारोळ्यातच दोघांचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर चालक पिकअप वाहनासह पळून गेला. दोन्ही तरुणांना मेडिकल येथे दाखल केले असता असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी राजेंद्र्र बद्रीलाल कटरे (४२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पटले यांनी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.