नागपुर येथे प्रतिष्‍ठापना करण्यात आलेला मस्‍कऱ्या गणपती  Pudhari Photo
नागपूर

Nagpur Gneshotsav | नागपूरच्या भोसले घराण्यातील मस्कऱ्या (हडपक्या) गणपती: बंगालवरील विजयाचा आनंदोत्सव

पितृपक्षात केली जाते प्रतिष्‍ठापना : उत्‍सवाचे यंदाचे २३८ वे वर्ष

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र उट्टलवार

नागपूर : श्रीमंत राजे खंडोजी महाराजांनी पितृपक्षात मस्कऱ्या (हडपक्या) गणपतीची चालु केलेली ही आगळीवेगळी परंपरा आजपर्यंत देशाचे हृदयस्थान असलेल्या नागपुरात कायम आहे. सध्या श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले हे महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या व्यवस्थापन व मार्गदर्शनात हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा करतात. या उत्सवास यावर्षी 238 वर्ष पूर्ण होत आहे. आज या श्री गणेशाचे आगमन झाले. उद्या बुधवारी 10 सप्टेंबरला स्थापना केली जाणार आहे. नागपुरातील 146 वर्षांची सांस्कृतिक परंपरा असलेल्या पिवळी, काळी मारबत मिरवणुकीसोबतच हडपक्या गणपती उत्सवाची ही अफलातून परंपरा म्हणता येईल.

इ.स. 1787 मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोंसले (उर्फ चिमणाबापू)यांनी या मस्कऱ्या (हडपक्या) या उत्सवाचे आयोजन केले.या मागील थोडक्यांत इतिहास असा की, शूर लढवय्ये समशेर बहाद्दूर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोंसले (उर्फ चिमणाबापू) हे अन्यायाच्या विरोधात लढत असतांना ते बंगालच्या स्वारीवर होते. बंगालवर विजय मिळवून परत येत असतांना कुळाचारी गणपतीचे विसर्जन झाले होते. शेवटी बंगालवर विजय मिळविण्याचा आनंद साजरा करण्याकरीता या मस्‍कऱ्या (हडपक्या) गणपतीची स्थापना झाली. यानिमित्ताने विविध नकला लावण्या, खडी गम्मत या सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करीत हा आनंदोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला. कालांतराने लोकमान्य टिळक यांनी देखील अन्यायाविरुध्द स्वातंत्र्यासाठी लढा देताना महाराजांच्या याच दुरदृष्टीचा अभ्यास करून टिळकांनी कुळाचारी गणपतीला सार्वजनिक उत्सवाचे रूप दिले.

श्रीमंत राजे खंडोजी महाराजाच्या काळात या गणपतीची 18 हाताची, 21 फुटाची मुर्ती स्थापन केली जात होती. त्या अनुषंगाने ही 18 हाताची 7 फुटाची गणेशाची मूर्ती स्थापीत केली जाणार आहे. या गणपतीचे विशेष महत्व म्हणजे हा नवसाला पावणारा गणपती आहे. आजही बऱ्याच भक्तांना प्रचिती येत आहे.

गणपतीची आगमन मिरवणुक मंगळवारला सायंकाळी 6 वाजता सी.पी अँड बेरार महाविद्यालय, तुळशीबाग येथून मार्गक्रमण करून ज्युनिअर भोसला पॅलेस, राजे प्रतापसिंह भोसले चौक (सुतिका गृह) कोतवाली पोलीस स्टेशन चौक, नरसिंग टॉकिज चौक, सिनीयर भोसला पॅलेस अशी पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT