Flood Alert Nagpur District
नागपूर : मागील तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरचा पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस सुरू असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत. गेले दोन दिवस नागपुरात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शहरातील अनेक सखल वस्त्यांमध्ये हाहाकार माजला आहे. सद्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमू सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
नागपुरातील नदी, नाल्याच्या काठावरील नंदनवन, हुडकेश्वर, नरसाळा, बेलतरोडी, पारडी , नरेंद्रनगर आदी अनेक सखल वस्त्यांमध्ये संततधार पावसाचे पाणी शिरले असून अनेकाना मनपा, आपत्ती व्यवस्थापन विभागाने बोटीद्वारे सुरक्षित बाहेर काढले आहे. अद्याप कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
नागपूर शहर-जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडून आढावा घेतला. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. नागरिकांनी सुद्धा आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
जिल्ह्यात कन्हान नदीची पाणी पातळी वाढली असून नाग नदी, पिवळी आणि पोहरा नद्यांच्या काठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कामठी तालुक्यातील पांढुर्णा गावात बोटीमार्फत बचाव कार्य करीत पुरात अडकलेल्या ८ व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सावनेर तालुक्यातही पावसाने अनेक घरांचे नुकसान झाले. नाले, नद्यांचे पाणी रस्त्यावर, पुलावरून वाहत असल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे.