Nagpur Farmers Protester FIR filed
नागपूर: शेतकरी कर्जमुक्ती, दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून सलग तीन दिवस नागपूर वर्धा रोडवर हायवे जाम करणारे आंदोलन संपल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.आता बच्चू कडू, राजू शेट्टी, वामनराव चटप, रविकांत तुपकर, अजित नवले आदी शेतकरी नेत्यांसह सुमारे अडीच हजार आंदोलकांवर बेलतरोडी पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने संताप व्यक्त होत आहे.
रेल्वे ट्रॅक उखडून फेका, मंत्र्यांना खाली खेचा, अशी चिथावणीची भाषा वापरली. पोलिसांनी सर्व घडामोडी ड्रोन कॅमेराद्वारे टिपल्याने कारवाई अटळ मानली जात आहे. नियोजित स्थळी आंदोलन न करता बेकायदेशीरपणे दुसऱ्याच जागी ठिय्या मांडत महामार्ग रोखणे, लोकांना नाहक त्रास होणे, वारंवार सूचना देऊनही शासन, प्रशासनाला जाहीरपणे शिवीगाळ करणे, पोलिसाशी गैरवर्तन असे गुन्हे दाखल केले गेले आहेत.
एकीकडे चर्चेला बोलवायचे, समिती नेमून वेळकाढूपणा करायचा, तारीख द्यायची आणि दुसरीकडे आधीच संकटात असलेल्या शेतकरी आंदोलकांवर गुन्हे दाखल करायचे हा सरकारचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महामार्ग मोकळा करावा, असा आदेश दिल्यानंतर त्याचे पालन करीत आंदोलकानी महामार्ग मोकळा केला. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक बोलावल्याने सर्व शेतकरी नेते चर्चेला गेले.
समाधानकारक चर्चा आणि सरकारकडून कर्जमुक्तीची योग्य वेळ जाहीर करून घेण्यात आम्ही यशस्वी झालो, हे दिव्यांग, मेंढपाळ आणि शेतकऱ्यांचे यश आहे, असे प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. समाधानकारक चर्चा न झाल्यास 31 ऑक्टोबर रोजी रेल्वे रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा बच्चू कडू यांनी आंदोलकांच्या सभेत सरकारचे प्रतिनिधी म्हणून चर्चेस आलेले राज्यमंत्री आशिष जैस्वाल,पंकज भोयर यांच्या उपस्थितीत दिला होता. त्यानंतर न्यायालयात वकिलामार्फत आंदोलन करणार नसल्याची ग्वाही दिली. मात्र,मुंबईत कर्जमुक्तीची तारीख मिळाली इकडे नागपुरात जल्लोष साजरा करीत कार्यकर्ते गावाकडे निघाले आणि लागलीच पोलिसांकडून गुन्हे दाखल प्रक्रियेला वेग आल्याचे दिसत आहे.