Fraud Mastermind Arrested Pudhari
नागपूर

Fake IPO Scam | बनावट IPO आणि शेअर बाजार गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक; 'मास्टरमाइंड' नागपुरातून अटकेत

अनुराग श्रीवास्तवविरोधात लखनऊ सायबर पोलिस ठाण्यात मोठ्या आर्थिक सायबर फसवणुकीचा गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Stock Market Fraud Mastermind Arrested

नागपूर : देशभरातील नागरिकांना बनावट आयपीओ (IPO), शेअर बाजारातील गुंतवणूक आणि फॅन्टसी गेमिंगच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर रॅकेटच्या कथित मास्टरमाइंडला उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स (यूपी एसटीएफ)ने नागपुरातून अटक केली आहे. अनुराग अरविंद श्रीवास्तव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध लखनऊ सायबर पोलिस ठाण्यात मोठ्या आर्थिक सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, अटकेनंतर आरोपीला ट्रान्झिट रिमांडवर लखनऊ येथे नेण्यात आले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मानकापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीश कालसेकर यांनीही यूपी एसटीएफने नागपुरातून आरोपीला ताब्यात घेतल्याची पुष्टी केली.

सोशल मीडियातून जाळे

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नागरिकांना शेअर बाजार व आयपीओमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत होता. इच्छुकांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करून बनावट ट्रेडिंग टिप्स, खोट्या नफ्याचे स्क्रीनशॉट आणि दिशाभूल करणारी माहिती दाखवत त्यांचा विश्वास संपादन केला जात होता.

त्यानंतर 'सेंच्युरी ॲप' नावाचे बनावट गुंतवणूक ॲप डाउनलोड करण्यास सांगून विविध बँक खात्यांमध्ये लाखो रुपये जमा करण्यास भाग पाडले जात होते. ॲपमध्ये गुंतवणूक आणि नफा वाढत असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात ही संपूर्ण व्यवस्था फसवणुकीची असल्याचे तपासात उघड झाले आहे.

मोठा मुद्देमाल जप्त

यूपी एसटीएफच्या कारवाईत आरोपीकडून ३.१७ कोटी रुपयांची रोकड, २.५० कोटी रुपयांचे दोन स्वाक्षरी नसलेले धनादेश, एक लॅपटॉप, एक आयफोन, दोन सिमकार्ड, तीन कंपन्यांचे शिक्के, सहा कोरे चेकबुक, १३९ पानांची महत्त्वाची कागदपत्रे आणि एक टाटा नेक्सॉन कार जप्त करण्यात आली.

२०२२ पासून सुरू होता गोरखधंदा

चौकशीत आरोपीने २०२२ पासून साथीदारांसह बनावट गेमिंग आणि फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

तपासात आरोपीविरुद्ध विविध राज्यांत ११ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले असून, या टोळीचा संबंध राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवरील तब्बल ३,०८७ तक्रारींशी जोडला गेला आहे. तपास यंत्रणांनी आतापर्यंत सुमारे दोन कोटी रुपयांशी संबंधित बँक खाती गोठवली असून, या आंतरराज्यीय रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT