BJP 10 lakh offer allegation Congress
नागपूर : निवडणुकीपूर्वीच महायुतीची विजय घोडदौड सुरू आहे. मुंबई, पुण्यातील महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आलेले असताना आता उपराजधानी नागपूर येथेही बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना बळ मिळताना दिसत आहे. या संदर्भात थेट आरोप काँग्रेसने आज उमेदवारांच्या मार्गदर्शन मेळाव्यातून केल्याने खळबळ माजली आहे.
स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिनविरोध निवडणुकीमुळे विरोधकांना मिरच्या झोंबत असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात आज तीन जाहीर सभा आहेत. नागपुरातील प्रभाग २९ मधील महापालिकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रामचंद्र गजबे या काँग्रेसच्या उमेदवाराला भाजपने चक्क १० लाखांची ॲाफर दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
याला महत्वाचे कारण म्हणजे प्रभाग क्रमांक २९ मध्ये काँग्रेस आणि भाजप असे दोनच उमेदवारी अर्ज आले होते. त्यामुळे हा अर्ज मागे घेऊन भाजपला ही निवडणूक बिनविरोध करायची होती, असा आरोप रामचंद्र गजबे यांनी यावेळी केला. आठ प्रभागात भाजप, काँग्रेसच्या थेट लढतीचा दावा शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केला.
नागपुरातील महाकाळकर सभागृह येथे आज मंगळवारी दुपारी झालेल्या काँग्रेस उमेदवार मेळाव्यात रामचंद्र गजबे यांचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दक्षिण नागपूरचे काँग्रेसचे विधानसभा उमेदवार गिरीश पांडव यांनी याकडे लक्ष वेधले होते. आता भाजप या आरोपांना, काँग्रेसने आज विविध आकर्षक योजनांचा समावेश असलेल्या जाहीरनाम्याला कसे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.