Nagpur Missing Family Case Pudhari
नागपूर

Nagpur Missing Family Case : धंतोलीतील पाच जण बेपत्ता प्रकरणाने वाढवली चिंता; वैद्य दाम्पत्य हत्याकांडाची पुन्हा आठवण

आर्थिक व्यवहार, मालमत्ता वाद आणि डिजिटल पुराव्यांकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Missing Family Case

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकाच कुटुंबातील पाच जण रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याच्या घटनेने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागे कर्जबाजारीपणा, आर्थिक व्यवहार, मालमत्तेचा वाद किंवा इतर कोणते कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, अशा घटनांमध्ये सुरुवातीला केवळ ‘मिसिंग’ म्हणून नोंद करून तपास मर्यादित ठेवणे धोकादायक ठरू शकते, याची आठवण रामेश्वरीतील गाजलेल्या वैद्य दाम्पत्य हत्याकांडाने पुन्हा करून दिली आहे.

एकाच कुटुंबातील पाच जण बेपत्ता झाल्‍याचे शहराचे लक्ष

धंतोलीतील पाच सदस्यांच्या बेपत्ता प्रकरणाने सध्या शहराचे लक्ष वेधून घेतले आहे. एकाच कुटुंबातील सर्व सदस्य अचानक संपर्काबाहेर गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला असला तरी या प्रकरणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि उत्सुकता दोन्ही वाढल्या आहेत.

वैद्य दाम्पत्य हत्याकांडाची पुन्हा आठवण

अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी रामेश्वरीतील काशीनगर परिसरात राहणारे अतुल पंढरीनाथ वैद्य आणि त्यांची पत्नी वंदना वैद्य अचानक बेपत्ता झाले होते. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी स्वेच्छेने घर सोडले असावे किंवा अन्य काही वैयक्तिक कारणामुळे ते गायब झाले असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, तपास जसजसा पुढे गेला, तसतसे या प्रकरणातील धक्कादायक वास्तव समोर आले.तपासात असे उघड झाले की, तीन हजार चौरस फुटांच्या जागेवर ताबा मिळविण्याच्या वादातून वैद्य दाम्पत्याचे अपहरण करून त्यांच्या घरातच हत्या करण्यात आली होती. गुन्हा घडल्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अत्यंत शिताफीने योजना आखली होती. मृत दाम्पत्याचे मोबाईल फोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आणि बंद करून खोटे लोकेशन निर्माण करण्यात आले होते. त्यामुळे तपास बराच काळ बेपत्ता व्यक्तींच्या चौकटीतच फिरत राहिला.

तपासातील त्रुटींवर न्यायालयानेही व्‍यक्‍त केली होती नाराजी

या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर तपासाला गती मिळाली आणि प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन विशेष तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, तपासातील त्रुटींवर न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली होती. अखेर पोलिसांनी तपासाची कोंडी फोडत बुटीबोरीजवळील जंगलातून एकाच खड्ड्यात पुरलेले वैद्य दाम्पत्याचे मृतदेह शोधून काढले आणि संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला.याचप्रमाणे वंजारीनगर येथील लक्ष्मीप्रयाग अपार्टमेंटमध्ये राहणारे अ‍ॅडव्होकेट भैयासाहेब धवड आणि त्यांची पत्नी वनिता धवड हे जुलै २०१८ पासून रहस्यमयरीत्या बेपत्ता आहेत. या प्रकरणातही सुरुवातीला विविध शक्यता व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांच्या बेपत्ता होण्यामागील सत्य अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी करण्यात आली होती, मात्र गुन्हे शाखेकडे तपास गेल्यानंतरही अद्याप ठोस निष्कर्ष हाती आलेला नाही.

शास्त्रशुद्ध तपासाची मागणी

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर धंतोलीतील पाच सदस्यांच्या बेपत्ता प्रकरणाकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ कुटुंब बेपत्ता झाल्याची नोंद करून तपास मर्यादित ठेवण्यापेक्षा आर्थिक व्यवहार, मालमत्तेचे वाद, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, बँक व्यवहार, डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड, प्रवासाचा मागोवा तसेच संबंधित व्यक्तींचे सामाजिक आणि व्यावसायिक संबंध यांची शास्त्रशुद्ध तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT